सुरवडी गणातून युवा उद्योजक शंभूराज बोबडे यांना उमेदवारी द्यावी; जनतेतून जोरदार मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - सुरवडी गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी युवा उद्योजक पैलवान शंभूराज परमेश्वर बोबडे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावांतून होत आहे. माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार सचिन पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून शंभूराज बोबडे यांची ओळख आहे.
बांधकाम क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय कामगिरी करत प्रसाद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून फलटण शहरासह ग्रामीण भागात वेगळी ओळख निर्माण करणारे पैलवान शंभूराज बोबडे हे नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरवडी या सर्वसाधारण गणातून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाडगेवाडी परिसरातील ज्येष्ठ नेते व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले दशरथ आबा बोबडे यांच्या कुटुंबाला फलटण पश्चिम भागात विशेष मान आहे. याच पार्श्वभूमीवर दशरथ आबा बोबडे यांचे पुतणे आणि प्रसाद कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा असलेले पैलवान शंभूराज बोबडे यांच्या उमेदवारीसाठी भाजपसह मित्रपक्ष आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
बोबडे परिवाराचे पश्चिम भागातील अनेक गावांशी घराघरात नाते असून, हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे सुरवडी गणातून पंचायत समितीसाठी पैलवान शंभूराज बोबडे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी घाडगेवाडी परिसरासह पश्चिम भागातील गावांतून होत आहे.

No comments