पिंपरदचे खड्डे लोकं मेल्यावरच भरणार का? - ग्रामस्थांचा संताप; 26 जानेवारीला पालखी महामार्गावर रास्ता रोको
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - पिंपरद (ता. फलटण) येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली तसेच पिंपरद गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, “लोकं मेल्यावरच हे खड्डे भरणार का?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आळंदी–पंढरपूर पालखी मार्गाचे काम गेली तीन ते चार वर्षे सुरू होते. या कालावधीत विकासकामाच्या नावाखाली पिंपरद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा त्रास सहन केला. आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असताना, पुलाखाली आणि गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे अद्याप तसेच आहेत. हे खड्डे नेमके कोणी भरायचे? महामार्गाची एजन्सी की स्थानिक प्रशासन? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्याने पिंपरदसह राजाळे, निंबळक व इतर गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता अपघाताची भीती वाढली आहे. प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेंड्याच्या कातड्याचे पांघरूण घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारी रोजी पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय पिंपरद ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments