Breaking News

भाजपला वगळून शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांची गोपनीय खलबते ; 'चहा चांगला होता' - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया

सातारा दिनांक १५ (प्रतिनिधी) - सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वगळून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या नेत्यांची चर्चेची प्राथमिक फेरी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या बंगल्यावर पार पडली.

फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांचा चहा गोड होता असे हसून सांगत बरेच काही सांगितले. बैठकीला राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये बंद दाराआड जोरदार खलबते झाली. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी एकत्रितपणे रणनीती आखण्याची गरज आहे, या विषयाच्या संदर्भाने प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवत पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत, नवीन रणनीती आखण्याची सुरुवात केल्याची संकेत मिळत आहेत. भाजपने यापूर्वीच स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. पालकमंत्री देसाई यांनी एकत्र लढण्यासाठी आज चर्चेला बोलवले होते. त्यानुसार चर्चेची पहिली फेरी झाल्याचे खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments