डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६ च्या अध्यक्षपदी हरीश (आप्पा) काकडे यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण (२०२६) च्या अध्यक्षपदी हरीश (आप्पा) काकडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
फलटण शहरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. या महोत्सवाच्या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधन उपक्रम तसेच युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार केला जातो.
नूतन अध्यक्ष हरीश (आप्पा) काकडे यांच्या नेतृत्वाखाली २०२६ सालचा जयंती महोत्सव अधिक व्यापक, सर्वसमावेशक व प्रेरणादायी स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव व संघटन कौशल्याच्या जोरावर महोत्सव यशस्वीरीत्या पार पडेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments