बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे,अन्यथा दंडात्मक कारवाई - मुख्याधिकारी निखिल जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - फलटण नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी ते ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून नियमित करून घ्यावेत, अन्यथा संबंधित नळ कनेक्शन कायमचे बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.
फलटण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शनबाबत नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. ३१ जानेवारी अखेर नागरिकांनी स्वतःहून नळ कनेक्शनची नोंदणी नगरपालिकेत केल्यास कोणताही दंड न आकारता ते नियमित करून दिले जाणार आहेत.
दिलेल्या मुदतीनंतरही बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित न करणाऱ्या नागरिकांचे कनेक्शन कायमचे बंद करण्यात येणार असून, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.
यासोबतच शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन देखील कायमचे बंद करण्यात येणार आहेत. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पर्याय म्हणून दोन ते पाच नागरिकांच्या गटासाठी ग्रुप नळ कनेक्शन देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
फलटण शहरातील नागरिकांना वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, हा निर्णय त्याचाच एक भाग आहे. येत्या काही दिवसांत शहरातील सर्व भागांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचेही मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.

No comments