Breaking News

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत ३० राज्यातील ६० संघ सहभागी होणार - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

60 teams from 30 states will participate in the national Kho-Kho tournament - Shrimant Sanjivraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १८ -  ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे दि. २८ ऑक्टोबर ते दि. ०२ नोव्हेंबर रोजी फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथे होत असलेल्या ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेमध्ये ३० राज्यातील ६० संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ३० किशोर म्हणजेच मुलांचे संघ तर ३० किशोरी म्हणजेच मुलींचे संघ असणार आहेत.  फलटण येथे होणाऱ्या ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे नियोजन हे सर्वोत्कृष्ट करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

    फलटण येथील मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धा समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  

    फलटण येथे होत असलेल्या ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेमध्ये ३० राज्यातील ६० संघ सहभागी होणार आहेत.   प्रत्येक संघामध्ये १५ खेळाडू असणार आहेत. तर प्रत्येक संघाबरोबर त्या संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. असे एकूण किशोर (मुले) स्पर्धक ५०० तर किशोरी (मुली) ५०० असणार आहेत. तर सर्व संघाचे मिळून एकूण ६० प्रशिक्षक असणार आहेत व ४० पंच असणार आहेत. खो - खो स्पर्धेचे नियोजन करताना खेळाडूंसह इतर सर्वच शिक्षक, पदाधिकारी व अधिकार्यांच्या भोजन व निवास व्यवस्था काटेकोर करण्यासाठी सर्वजण कार्यरत आहोत. खो - खो स्पर्धेमध्ये फलटणला कोणाचाही गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्वजणच घेत आहोत असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

    फलटणला खो - खो खेळाची एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे. खो - खोची पंढरी म्हणूनच फलटणला ओळखले जाते. राज्यासह देशामध्ये खो - खो खेळाचे जे खेळाडू व शिक्षक आहेत. त्यामधील बहुतांशी खेळाडू व शिक्षक हे फलटणच्या संबंधित आहेत. खो - खो स्पर्धा व फलटण हे एक समीकरण आहे. या पूर्वी फलटणला राष्ट्रीय व राज्य स्तरीय खो - खो च्या स्पर्धा  यशस्वी नियोजनामध्ये संपन्न झालेल्या आहेत. माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी भव्य अशी प्रेक्षक गॅलरी असणार आहे. क्रीडांगणाची जी बाजु असते ती खेळात महत्त्वाची असते. त्याचे सुद्धा नियोजन करण्यासाठी त्यामधील तज्ञ मंडळी कार्यरत आहेत. फलटणला होणारी ही स्पर्धा ही न भुतो, न भविष्यतो अशीच झाली पाहिजे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्प्ष्ट केले.

No comments