फलटण तालुक्यातील लंपी परिस्थिती नियंत्रणात असली तरी अधिकाऱ्यांनी दक्ष राहून उपचार करावेत - पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
![]() |
लंपी परिस्थितीची पाहणी व आढावा घेवुन सुचना करताना सचिन्द्र प्रताप सिंह त्यावेळी डॉ. व्ही.टी. पवार व अन्य |
लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील लंपीची परिस्थिती नियंत्रणात आहे. तालुक्यात गोवंशीय जनावरांचे लंपी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण शंभर टक्के पुर्ण झाले आहे. लंपीची परिस्थिती आटोक्यात असली तरी पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहून उपचार करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिल्या आहेत.
फलटण तालुक्यातील लंपीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती जाणुन घेण्यासाठी सिंह यांनी तरडगाव, धुळदेव, फलटण व खामगाव परिसरातील लंपी रोगाने बाधित झालेल्या जनावरांच्या औषधोपचाराचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन व सुचना केल्या. यावेळी
त्यांच्यासमवेत प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. पंचपोर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. व्ही.टी. पवार तसेच डॉ. नंदकुमार फाळके, डॉ. हगवणे, डॉ. भुजबळ, डाॅ. मोरकाने, डॉ. पूनम भोसले व डॉ. प्राजक्ता भुजबळ आदींची उपस्थिती होती.
आजपर्यंत तालुक्यात एकूण 28 गावात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून एकूण 1434 जनावरे या रोगानी बाधित झाले आहेत. आजवर फलटण तालुक्यातील एकूण 548 जनावरे उपचारानंतर बरी झाल्याचे निदर्शनास आणुन देत लंपी रोग नियंत्रणाकरिता फलटण तालुक्यासाठी बाहेरच्या तालुक्यातून 3, इतर संस्थांकडून 3 व पुणे मुख्यालयातील 2 अधिकारी यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एकूण 20 पशुधन पर्यवेक्षक व 11 पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी बाधित जनावरावर उपचार करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
लंपी चर्म रोगाच्या उपचाराकरीता आवश्यक असणारी सर्व औषधे सर्व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून तज्ञ पशुवैद्यकामार्फत बाधित जनावरावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगत सर्व बाधित रुग्णांवर उपचाराकरिता तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथील तज्ञांचीही लंपी रोग प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता नेमणूक करण्यात आली असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
No comments