वय कमी करून पोलीस - सैन्य भरती करतो म्हणुन ३ लाख रुपये घेऊन युवकाची फसवणूक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - कोडवलकर करिअर ॲकॅडमी वडले ता. फलटण येथे वय कमी करून पोलीस भर्ती किंवा आर्मी मध्ये भरती करतो असे म्हणुन ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी ॲकॅडमीच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोडवलकर करिअर ॲकॅडमी वडले ता.फलटण येथे दि.१०/५/२०२२ रोजी प्रवेश घेताना सुनिल त्र्यंबक पवार (वय २५) रा.फडतरवाडी, विखळे ता. कोरेगाव यास प्रवेशाप्रसंगी वय जास्त असल्याने त्यास तुला ॲकॅडमीत प्रवेश घ्यायचा असेल तर, तुझे वय कमी करावे लागेल नाहीतर आम्हाला वय कमी करून लावण्यासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील. तुझे वय कमी करून पोलीस भर्ती किंवा आर्मी मध्ये भरती करू, असे आमीष दाखवून, ॲकॅडमीचे १) रविंद्र नामदेव कोडवलकर रा. दालवडी ता. फलटण २) अवचित दादासो ताटे रा. वारुगड ता. माण जि. सातारा यांनी सुनिल त्र्यंबक पवार कडुन दि. १२/५/२०२२ रोजी ४० हजार रुपये ऑनलाईन व दि. १७/५/२०२२ रोजी शिंगणापूर रोड, फलटण येथे २ लाख ६० हजार रुपये रोख घेवुन फसवणूक केली असल्याची फिर्याद सुनिल त्र्यंबक पवार यांनी केली आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.
No comments