Breaking News

नेव्ही भरती साठी घेतले १० लाख रुपये ; आकाश डांगे कडून युवकाची फसवणूक

10 lakh taken for Navy recruitment; Youth cheated by Akash Dange

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  इंडियन नेव्हीमध्ये भरती करण्यासाठी १० लाख रुपये रोख स्वरूपात घेऊन, इंडियन नेव्हीचे बनावट जॉइनिंग लेटर, गेट पास व ट्रेनिंग अकॅडमी कार्ड देऊन त्यावर बनावट शीक्के मारून व बनावट सही करून  शिंदेवाडी येथील युवकाची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश डांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

   आदित्य संदीप यादव वय २२ वर्ष रा. शिंदेवाडी, खुंटे ता. फलटण याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये आकाश काशीनाथ डांगे  हॉटेल गॅलक्सी फलटण येथे भेटला. त्यावेळी त्याने आदित्यकडे एन डी ए मध्ये भरतीसाठी प्रयत्न करीत असलेबाबत व  मेडिकल अनफिट झाल्यामुळे भरती होता आले नाही  याची माहिती घेतली, त्यावेळी आकाशने आदित्यला सांगितले की, तुम्ही मला १० लाख रुपये दया, मी तुम्हाला नेव्ही मध्ये भरती करुन देतो, माझी नेव्हीच्या कार्यालय आय.एन.एस शिवाजी लोनावळा येथे ओळख आहे, तुम्हाला परिक्षा देण्याची गरज नाही, मेडिकल फिट करुन देतो. 

त्यानंतर  मार्च २०२० आकाश डांगे याने आदित्य व वडिल संदिप यांना भेटण्यास बोलाविले.  त्यावेळी आकाश डांगे याने आदित्यचे १० वी १२ वी चे रिझल्ट, कॉलेज चे एल.सी. आधारकार्ड, पॅनकार्ड मागितल्याने त्यास असे सर्व कागदपत्रे घेतले. त्यानंतर आदित्य व त्याच्या वडिलांचा विश्वास संपादन करून म्हणाला की, ५ लाख रुपये अगोदर दया व काम झाल्यानंतर ५ लाख रुपये दया असे सांगितले. त्यानंतर त्याने सांगितले नुसार आदित्यच्या वडिलांनी सोसायटी चे कर्ज काढुन ५ लाख रुपये आणले व आकाश डांगे यास  शिंदेवाडी येथे घरी दिले.

पैसे दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनी आकाश डांगे हा आदित्यच्या घरी आला  व त्याच्या वडिलांना नेव्हीचे जॉयनिंग लेटर व ट्रेनिंग अॅडमिट कार्ड देवुन १३/४/२०२० रोली चिल्का ओरिसा येथे ट्रेनिंग करिता हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर ५ दिवसांनी निसर्ग हॉटेल सुरवडी येथे कागदपत्रे पडताळणी बोलाविले.  त्यावेळी आकाश डांगे याने आदित्यचे स्कर्निंग मशीन वर अंगठयाचे ठसे घेतले. त्यावेळी  आकाश याने उरलेले ५ लाख देण्यास सांगितले. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी आदित्यच्या वडिलांनी  अशोक वसंत जगताप यांचेकडुन उसणे ५ लाख रुपये घेवुन, ते शिंदेवाडी येथे आकाश डांगे यास दिले. त्यावेळी १० दिवसांनी आय एन एस चिल्का येथील गेट पास देतो असे आकाश डांगे याने सांगितले. त्यानंतर आकाश डांगे यास इंदापुर पोलिस ठाणे येथील गुन्हयात अटक झाल्याचे आदित्यला समजले.

काही दिवसानंतर आकाश डांगे जामीनावर सुटुन आल्यावर काम झाले नाही, म्हणून आम्ही त्याचे कडे गेलो व त्याने घेतलेले पैसे मी मागितले असता, आकाश डांगे म्हणाला की, तुमचे काम झाले आहे, तुम्ही काळजी करु नका, तुम्हाला लवकरात लवकर गेट पास देतो. त्यानंतर त्याने दिनांक ०१/०७/२०२१ रोजी मला भेटुन दिनांक ०५/०७/२०२१ रोजीचे आय. एन. शिवाजी लोनावळा येथील गेट पास देवुन असे सांगितले की, आपण दोघे मिळून लोणंद ते लोणावळा रेल्वे ने जायचे तेथुन आपल्याला आय.एन.एस शिवाजी ते आय. एन. एस चिल्का त्याचे बस ने जायचे आहे. त्यानंतर दिनांक ०५/०७/२०२१ रोजी मी व माझे वडिल, माझा मित्र समीर बॅग घेवुन लोणंद रेल्वे स्टेशन येथे जावुन आकाश डांगे याची वाट पाहत थांबलो परंतू तो आला नाही म्हणुन मी माझे फोनवरुन फोन केले पण त्याने फोन उचलेले नाही. 

  अशारीतीने आकाश काशिनाथ डांगे वय २८ वर्ष रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण याने,  आदित्य संदीप यादव वय २२ वर्ष रा. शिंदेवाडी, खुंटे ता. फलटण यास इंडियन नेव्ही मध्ये भरती करतो, असे आश्वासन देऊन, आदित्य कडून दहा लाख रोख स्वरूपात घेऊन, बनावट इंडियन नेव्ही जॉइनिंग लेटर ,गेट पास, ट्रेनिंग अकॅडमी कार्ड देऊन त्यावर बनावट शीक्के मारून व बनावट सही आदित्य याची फसवणूक केली असल्याची फिर्याद आदित्य संदीप यादव याने दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करीत आहेत.

No comments