बोराटवाडी व खासदारांचे नाते वटसावित्रीचे ; बश्या बैल उठतो, त्यावेळी काय होते ते कळेल तुम्हाला - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
![]() |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क अभियानात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर |
Ramraje Naik Nimbalkar replied to the allegations of the opponents
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदारांनी अडीच वर्षात रेल्वे आणली म्हणतात पण ती रेल्वे चालते का ? आता म्हणतात, मी रस्ता आणला, ४६ हजार कोटी रुपयांची कामे आणलीत, पण प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नाही, अशी मिश्किल टीका करत, आपले ४६ हजार कोटी आपल्यालाच लखलाभ, तुम्ही जो खर्च करणार आहात, तो माण तालुक्यात बोराटवाडी गावात खर्च करावा आणि त्यांचे कल्याण करावे, कारण तुमचे (खासदारांचे) आणि त्यांचे (भाजपा जिल्हाध्यक्षांचे) नाते हे वटसावित्रीचे नाते आहे, व ते न तुटता राहावे असा आशीर्वाद नाईक निंबाळकर यांचा ज्येष्ठ म्हणून देतो, आपला संसार गोरेंबरोबर सुखी चालावा, फक्त त्या संसारात आमचा तालुका घेऊ नका, ही विनंती, तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा, मला माझ्या पद्धतीने जाऊ द्या, एक दोन वेळा माझ्यावर बोललात, मी माफ केले आहे, पण याच्यापुढे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदारांना दिला. तर बश्या बैल म्हटल्याच्या टीकेचा समाचार घेताना, बश्या बैल उठतो, त्यावेळी काय होते ते कळेल तुम्हाला असा टोला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना हाणला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण येथील जनसंपर्क अभियान मेळाव्यात आ. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जेष्ठ नेते सुभाष शिंदे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, महादेवआबा पवार उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, गुंडगिरीची भाषा आम्ही सहन करणार नाही, गुंडांच्या भाषेला, गुंडांना समजेल अशाच शब्दात उत्तर दिले जाईल, त्यासाठी मला नागरिकांची साथ लागेल, निर्भीडपने काम केले तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व सीट्स आपण जिंकू, फलटण पंचायत समिती तर काही केले तरी जाऊन देणार नाही असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. मी कोणाच्या वाटेला जात नाही आणि माझ्या वाटेला गेले तर मी कोणाला सोडतही नाही, माझ्यावर बोलले तर मला काही नाही, पण माझ्या कार्यकर्त्यांना जर कोणी दम देत असेल तर याद राखा असा इशारा श्रीमंत रामराजे यांनी दिला.
मुळची भाजपा आता जिल्ह्यात राहिली नाही. काँग्रेसमध्ये असताना या दोघांनी आनंदराव पाटील यांना बाहेर काढण्याचे काम केले. भाजपमध्ये गेल्यानंतर मूळचे खरे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते, ते यांनी बाहेर काढले, आता जुने भाजपचे कार्यकर्ते यांच्याबरोबर दिसत नाहीत. हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या या पक्षातील खासदार व जिल्हाध्यक्षांच्या टोळीने आपणास हिंदुत्व हा शब्द लिहून दाखवावा, अशी टीका श्रीमंत रामराजे यांनी केली,
माढ्याचा खासदार हा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे निवडून आला; परंतु आमदार गोरे म्हणतात हा खासदार मीच निवडून आणला, गोरेंनी जर सगळं केले तर मग खासदार रणजितसिंह काय करतात, त्यांची बॅग धरून चालतात का? असा सवाल करून, यांचे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पाहिले तर शंभरच्या वर यांचे नसतील. मात्र माझ्याकडे व संजीवबाबांकडे रोज शंभरच्या वर माणसे येऊन भेटत असतात. कार्यकर्त्यांच्या नावावर कर्ज घेवुन त्या कार्यकर्त्याला आपल्याकडे ठेवण्याचे काम खासदार करत असतात, असा आरोप श्रीमंत रामराजे यांनी केला.
खासदार स्वतःला उद्योगपती संबोधतात पण माझे त्यांना उघड आव्हान आहे, कशाला तुम्ही कोरेगावला जाऊन रामराजे किती नालायक आहे असे सांगताय, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या सत्तेच्या जोरावर कॉरिडॉर मंजूर करून घ्या व उद्योग आणा, खासदारांनी उपळव्याचा कारखाना हलवावा व म्हसवडला सुरू करावा, बघू चालतोय का? गोरेंना म्हसवडचा कॉरिडॉर प्रकल्प होता, हे देखील माहीत नव्हते, हा प्रकल्प फक्त माण तालुक्याचा राहिला नाही तर तो सातारा जिल्ह्याचा आहे. आणि हा प्रकल्प म्हसवडला झाला तरी मला दुःख नाही, या प्रकल्पाची निवड दिल्लीतून केली असेल तर यात माझी चूक आहे का ? असा सवाल श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क अभियान च्या सुरुवातीस श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
No comments