शरयुच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता ; ११ लाख २२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शरयू साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात फलटण तालुक्यात प्रथमच ऐतिहासिक जे यापूर्वी कधीही झाले नाही असे विक्रमी ११ लाख २२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन, १० लाख ४३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादण घेतले आहे. चालू वर्षी गळीतास आलेल्या ऊसाची बिले एकरकमी अदा करण्यात आली असून उर्वरित ऊसबिले लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहेत अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांनी दिली आहे.
शरयू साखर कारखान्याचा सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाची सांगता समारंभपुर्वक करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरयु उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास तथा बापूसाहेब पवार, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिलाताई पवार, श्रीमती आशाताई पवार, संचालक अमरसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.
उच्चांकी ऊस गाळप केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बक्षीस म्हणून आणि एक आठवडा पगारी रजा देण्याची घोषणा यावेळी युगेंद्र पवार यांनी केली. कर्मचाऱ्यांना अशा स्वरूपात भेट देणारा शरयू हा बहुदा राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला आहे .
शरयूचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होऊन तो २८ एप्रिल २०२२ रोजी समाप्त झाला. एकंदरीत १९१ दिवस गळीत हंगाम चालला असे निदर्शनास आणुन युगेंद्र पवार म्हणाले, यंदा फलटणसह वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, माण, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे तालुक्यातील ऊस गळपास आल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली निघून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अगामी काळात शरयू कारखाना दैनंदिन गाळप क्षमता वाढवून उत्पादित सर्व ऊसाचे गाळप करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. तसेच थायलंड, ब्राझील, युरोपमधील यशस्वी साखर उद्योगांचा अभ्यास करून तेथील व्यवस्थापण आपल्याकडे राबविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही पवार यांनी आवर्जुन सांगितले.
दरम्यान चालू गळीत हंगामात उत्कृष्ट कार्य करून विक्रमी गाळप केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना सांघिक व वैयक्तिक पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह स्नेहभोजन व मुस्लिम कर्मचारी बांधवांना इफ्तार भोजन देण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक चीफ इंजिनिअर महादेव भंडारे यांनी केले. आभार संचालक अविनाश भापकर यांनी मानले.
No comments