Breaking News

फलटण शहरात सर्वसमावेशक शिवजयंती साजरी होणार : बाईक रॅली व भव्य मिरवणूक - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Comprehensive Shiva Jayanti to be celebrated in Phaltan: Bike Rally and Grand Procession - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फलटण शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या व राजकीय पक्षांच्या मंडळीसह विविध तरुण मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे वगैरे सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन साजरी करण्याचा किंबहुना सर्वच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी सर्वांनी एकत्र येऊन साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

      छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार वैशाख शु|| २ रोजी फलटण शहर व तालुक्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. यावर्षी  शिवजयंती उत्सव सोमवार, दि. २ मे रोजी संपन्न होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्षे शिवजयंती महोत्सव साजरा झाला नाही, तथापि यावर्षी सर्वांनी एकत्र येऊन एकच शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी ‘लक्ष्मीविलास पॅलेस' या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. 

छ. संभाजी महाराजांचे आजोळ या नात्याने त्यांचे उचित स्मारक फलटण शहरात असावे अशी मागणी फलटणकरांनी अनेक वर्षांपासून केली आहे, त्याला दुजोरा देत फलटण नगर परिषदेने स्मारक उभारण्यात पुढाकार घेऊन प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन समोरच्या जागेत ह नियोजित स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे, या स्मारक स्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार असून सदर तयार झालेला पुतळा या मिरवणूकीत सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

        फलटण शहर व तालुक्यात परंपरेप्रमाणे छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत असतो. महापुरुषांना अभिवादन करताना राजकारण विरहीत, गट - तट, जात - पात बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असते. याच भावनेतून या भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात फलटण शहर व तालुकावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

        फलटणचे माजी नगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे यांच्या पुढाकारातून यापूर्वी सर्वांनी एकत्र येऊन छ. शिवाजी महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता, तीच परंपरा पुढे सुरु ठेवून फलटण शहर व तालुक्यातील सर्व सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांना एकत्रित घेवून छ.  शिवाजी महाराज जयंती साजरी व्हावी व एकीचा संदेश सर्वत्र जावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

     छ. शिवाजी महाराज जयंतीदिनी  मंगळवार दि. २ मे रोजी सकाळी ९:०० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरुन बाईक रॅलीचे (दुचाकी रॅलीचे) आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये युवक व युवती सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळा परिसर येथून छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध चित्ररथ, उंट, हत्ती, घोडे यांचा तसेच शिवकालीन शस्त्रे जसे लाठी, काठी, बोथाटी, भाले, बर्चे वगैरेंचे प्रात्यक्षिकांसह भव्य मिरवणूकीला सुरुवात होणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

 अत्यंत शिस्तीने काढण्यात येणाऱ्या या मिरवणूकित बेंजो किंवा तत्सम वाद्या ऐवजी पोवाडा, गझी नृत्य, सनई, चौघडे, संबळ, लेझीम, तुतारी अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात विविध चित्ररथांसह मिरवणूक निघणार असल्याचे निदर्शनास आणून देत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळा, म. फुले पुतळा, गजानन चौक, शंकर मार्केट, शुक्रवार पेठ, उंब्रेश्वर चौक (मलठण), पाचबत्ती चौक, बारामती चौक या मार्गाने मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

      मोती चौक शिवजयंती उत्सव मंडळ, फलटणच्यावतीने छ. शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवार दि.१ मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री ८ वाजता प्रा. नितिन बानगुडे - पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानानंतर मध्यरात्री १२:०० वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात येणार असल्याचे सांगून फलटण शहर व तालुक्यातील सर्व मंडळांनी आपापल्या गावात, चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन छ. शिवाजी महाराज जयंतीदिनी फलटण शहरात आयोजित केलेल्या भव्य मिरवणूकीमध्ये सामील व्हावे आणि एकीचा संदेश द्यावा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments