छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटण येथे भव्य शोभा यात्रा
फलटण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून सायंकाळी काढण्यात आलेल्या प्रचंड शोभा यात्रा आणि सकाळच्या दुचाकी रॅलीस फलटण करांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.
फलटण शहर व तालुक्यातील सर्व शिवजयंती मंडळे, गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, सार्वजनिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष संघटना वगैरे सर्वांनी एकत्र येऊन यावर्षी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
कोरोना प्रादुर्भावापूर्वी माजी नगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारे सर्वांना एकत्र करुन शहर व तालुक्यात एकच शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता.
यावर्षी फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून सोमवार दि. २ मे रोजी सकाळी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळ्यापासून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर व परिसरातील युवक युवती मोठ्या संख्येने आपल्या वाहनांवर भगवे ध्वज, शिवप्रतीमा लावून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते, त्याचबरोबर विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक सहभागी झाले होते.
आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते सह्याद्री कदम, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, मिलिंद नेवसे, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, हणमंतराव सोनवलकर पाटील, किशोरसिह नाईक निंबाळकर, दादा चोरमले, अजय माळवे उपस्थित होते, तसेच अनेक मान्यवरांनीही दुचाकीवर पाठीमागे बसून सहभाग घेतला होता. विविध संस्था, संघटना, मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सांस्कृतिक भवन इमारतीसमोर बसविण्यात येणार असलेला छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा या मिरवणूकीतील चित्र रथांपैकी एका रथावर ठेवण्यात आला होता, त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराज, महाराणी छ. सईबाई महाराज यांचे पुतळे ही या चित्र रथावर विराजमान होते.
मिरवणूकीच्या अग्रभागी लाठी, काठी, बोथाटी वगैरे शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके, त्यामागे ढोल, लेझीम, डफ, तुतारी वगैरे मंगल वाद्ये आणि विविध मंडळांची हा व लेझीम पथके होती, त्यामागे असंख्य शिंग तुतारी वादक आणि त्यासमोर उमद्या घोड्यांवर शिवकालीन पोशाख केलेले युवक युवती अगदी दरबारी थाटात विराजमान झाले होते.
त्यामागे चित्र रथावर छ. शिवाजी महाराज, महाराणी छ. सईबाई महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता.
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या पुतळ्यानजिक महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी आ. दिपकराव चव्हाण, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह अन्य मान्यवर, विविध मंडळे, संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर मिरवणूक श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळा, म. ज्योतीराव फुले पुतळा, गजानन चौक, शंकर मार्केट, शुक्रवार चौक, वेलणकर दत्त मंदिर, मराठा समाज संस्थेचे श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, उंब्रेश्वर चौक, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक, बारामती चौक या मार्गाने छ. शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर विसर्जित करण्यात आली.
शहरातील प्रमुख मार्गावरुन जाताना मिरवणूकीच्या मार्गावर असणाऱ्या विविध मंडळांनी छ. शिवाजी महाराज प्रतिमा, खास मंडप उभारुन त्यामध्ये विराजमान केल्या होत्या, तर मिरवणूकीच्या मार्गावर त्या त्या भागातील अबालवृद्ध शहर वासीयांनी छ. शिवरायांना, महाराणी छ. सईबाई महाराज आणि छ. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ठीक ठिकाणी मोठी गर्दी केली होती.
No comments