फलटणमध्ये सर्व समावेशक शिवजयंती महोत्सव थाटाने साजरा करणार - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करुन, मोठ्या थाटाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील "लक्ष्मी विलास पॅलेस" या निवासस्थानी आयोजित बैठकीत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी शहर व तालुक्यातील शिवप्रेमी आणि विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटण तालुक्यामध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने शहर व तालुक्यात सर्व जण पुढे आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव या सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी दोन वेळा माजी नगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे यांनी सर्वांना बरोबर घेऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला, तीच परंपरा पुढे नेण्यासाठी फलटणमधील अनेक तरुण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व आपल्याकडे आले आणि त्यांनी शिवजयंती महोत्सवाची परंपरा पुढे नेण्यासाठी आग्रह धरला. म्हणूनच हा निर्णय तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करुन आगळा वेगळा शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
शिवजयंती महोत्सव राजकारण विरहित व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम व्यक्त करणारा आणि त्यांचे विचार, आदर्श पुढे नेणारा असल्याचे सांगून त्यादृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन शिवजयंती महोत्सवाचे नियोजन करण्यात येत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments