Breaking News

महाशिवरात्री निमित्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात मोफत लस्सी वाटप

Free Lassi distribution at Uttareshwar Temple, Vidni on the occasion of Mahashivaratri

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ फेब्रुवारी २०२५ - महाशिवरात्री निमित्ताने विडणी येथील ऐतिहासिक उत्तरेश्वर मंदिरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग(अध्यक्ष)यांच्या संयुक्त विद्यमाने भाविक भक्ताना मोफत लस्सी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली.

    विडणी येथे उत्तरेश्वर मंदिर प्राचीन मंदिर असून हे जागृत देवस्थान आहे.या उत्तरेश्वराच्या भूमीत विडणी ग्रामस्थ आपल्या दिवसाची सुरुवात या उत्तरेश्वराच्या दर्शनाने करीत असतात. महाशिवरात्री दिवशी तर हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात, यामुळे येणाऱ्या सर्व भाविकांना विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या तर्फे प्रत्येक वर्षी मोफत लस्सीचे वाटप करण्यात येते, यावेळीही तोच स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.

    महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा होणारा भगवान शिवास समर्पित सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा दिवस शिव-पार्वती विवाह, शिवाने विष प्राशन करून जगाचे रक्षण केलेला दिवस,आणि अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो, या दिवशी उपवास, जागरण, रुद्राभिषेक आणि ‘ओम नमः शिवाय’ जपाद्वारे भक्ती केली जाते.

    महादेव-पार्वती विवाह: या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला, त्यामुळे या रात्रीला "शिव आणि शक्तीच्या मिलनाचा" उत्सव मानला जातो. अज्ञान व अंधाराचा नाश: महाशिवरात्री ही रात्र अंधकार आणि अज्ञानावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. या रात्री जागृत राहून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता मिळते.

    समुद्र मंथनातून निघालेले 'हलाहल' विष भगवान शंकराने प्राशन केले आणि जगाला वाचवले. हा दिवस त्या महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, म्हणजेच त्यांचे ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्याच्या शरीरातील नैसर्गिक ऊर्जा उर्ध्वगामी होते. या रात्री जागरण केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवर मोठा बदल अनुभवता येतो.

    महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास करून शिवाचे ध्यान केल्याने पापांचा नाश होतो. थोडक्यात,महाशिवरात्री हा भक्ती, साधना आणि आत्म-शोधाचा अत्यंत पवित्र असा दिवस आहे.यामुळे विडणी येथे उत्तरेश्वर मंदिरात हजारो भाविक भक्त येतात त्यांची सेवा करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी गेली अनेक वर्षे झाले हा मोफत लस्सी वाटप करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

No comments