फलटणच्या साधना घाडगे यांना ‘आद्या पुरस्कार’ ; महाविकास 2026 राज्यस्तरीय विक्री परिषदेत पुरस्कार प्रदान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि १६ - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज गावच्या सौ. साधना तुकाराम घाडगे यांना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आद्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन Indian Direct Selling Association (IDSA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविकास 2026 या राज्यस्तरीय विक्री परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही परिषद दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाली. महाराष्ट्र हे देशातील डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठे मार्केट असून राज्यात सुमारे दहा लाख सक्रिय विक्रेते कार्यरत आहेत. यामध्ये ४४ टक्के महिलांचा सहभाग आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समाजात प्रेरणादायी बदल घडविणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यातील दहा महिलांची आद्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सौ. साधना घाडगे या महिला आर्थिक विकास महामंडळ, सातारा संचालित ओम साई लोकसंचालित साधन केंद्र, फलटण अंतर्गत कानिफनाथ स्वयंसहायता महिला बचत गट शी संलग्न आहेत. ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
हा पुरस्कार श्री. अनिल डिग्गीकर (अतिरिक्त मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र), माननीय श्री. मुकेश शर्मा (सदस्य, राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई), मा. श्रीमती वंदना मिश्रा (अध्यक्ष, जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोग, मध्य मुंबई), अॅड. श्री. उदय वारुंजीकर (सदस्य, ग्राहक वकील संघटना, मुंबई), श्री. संदीप वाही (उपाध्यक्ष, विक्री व प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय विपणन कॉर्पोरेशन लिमिटेड) व श्री. प्रांजल डॅनियल (मुख्य रणनीतिकार, स्ट्रॅटेजी इंडिया) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी सौ. शोभा विलास बच्चे (जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, सातारा), श्री. सिद्धराम माशाळे (विभागीय व्यवसाय सल्लागार, पुणे), श्री. विलास बच्चे (विभागीय सल्लागार, पुणे), श्री. अभिजीत काटकर (जिल्हा प्रकल्प सल्लागार, सातारा) तसेच सौ. शीला घाडगे (व्यवस्थापक, ओम साई लोकसंचालित साधन केंद्र, फलटण) यांनी मोलाचे सहकार्य केले.
या सन्मानामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचा गौरव वाढला असून ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

No comments