फलटण न्यायालय परिसरात भारतीय संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि १६ - भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख न्यायालयाच्या आवारात बसविण्यास मान्यता देण्यात यावी, अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६, फलटण यांच्यावतीने न्यायमुर्ती नितीन आर. बोरकर, न्यायमुर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधान हे देशाचे शासन चालविणारे मूलभूत नियम व तत्त्वे प्रदान करते. संविधानातील उद्देशिका समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा सार सांगते. ही मूल्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावीत आणि न्यायालयीन परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला संविधानाची प्रेरणा मिळावी, यासाठी न्यायालयाच्या आवारात उद्देशिकेचा शिलालेख बसविणे अत्यंत आवश्यक आहे.
या उपक्रमाला मान्यता देऊन आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, अशी नम्र विनंती समितीने केली आहे. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणार असून, संविधानाबद्दल जनजागृती घडवून आणण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
फलटण येथील न्यायालयीन व सामाजिक वर्तुळात या मागणीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, मान्यता मिळाल्यास हा उपक्रम न्यायालयीन परिसराला एक प्रेरणादायी स्वरूप देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments