Breaking News

फलटण शहरासाठी १५ कोटी रुपये मंजूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन २.५ कोटी, सुपर मार्केट ५ कोटी, सीसी टीव्ही २.५ कोटी व इतर ५ कोटी

Rs 15 crore sanctioned for Phaltan city

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्र  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटण शहरातील विविध लोकोपयोगी आणि लोकहिताच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना. अजित पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी १५ कोटी रुपयांचा भरीव निधी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये यापूर्वीही मंजूर

    राज्य शासनाने फलटण शहर व तालुक्यासाठी विविध योजनांमधून नळ पाणी पुरवठा योजना, रस्ते, आरोग्य सुविधा, पाणंद रस्ते, प्रा. शिक्षण विशेषत: प्रा. शाळांच्या इमारती यासाठी यापूर्वीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे.  शहर व तालुक्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग नव्याने जात आहेत तर सध्याच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होत असल्याने दळणवळणाच्या सुविधांमध्ये भरीव वाढ होत असल्याचे तसेच त्यासाठीही केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन व सुपर मार्केट फेर उभारणीसाठी ७.५ कोटी

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतून १० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये मंगळवार पेठेतील सध्याची जुनी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इमारत पाडून त्याजागी नवीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इमारत उभारणे कामी २.५ कोटी आणि रविवार पेठेतील सध्याचे सुपर मार्केट पाडून त्याच जागेवर नवीन सुपर मार्केट उभारणे कामी ५ कोटी रुपये, दत्त नगर ते शिंदे बिल्डिंग ते दगडी पूल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर नाला बंदिस्त करणे कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

सी. सी. टी. व्ही. यंत्रणेसाठी २.५ कोटी

        आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार सेफ सिटी योजनेंतर्गत फलटण शहरात सी. सी. टी. व्ही. यंत्रणा उभारणे कामी अडीच कोटी आणि प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे  अत्याधुनिक अँक्वास्टिक ध्वनी यंत्रणा बसविणे साठी अडीच कोटी रुपये असे एकूण ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

दोन्ही इमारतींची फेर उभारणी वाढत्या लोकवस्तीसाठी उपयुक्त ठरणार

        ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणी नुसार मंजूर झालेल्या १० कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर समाज मंदिर आणि सुपर मार्केट या दोन जुन्या, जीर्ण आणि सद्यस्थितीत वापरा योग्य नसलेल्या परंतू अत्यंत गरजेच्या दोन्ही वास्तूंची फेर उभारणी झाल्याने वाढत्या लोकवस्तीच्या अपेक्षा, गरजा, मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने या इमारतींची उभारणी करता येणार आहे. त्यामध्ये आवश्यक अत्याधुनिक साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या दोन्ही इमारतींची फेर उभारणी शक्य होणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पाण्याचा फेर वापर शक्य तसेच आरोग्य हानी टळणार

       दत्तनगर - दगडी पूल - हनुमान मंदिर - वेलणकर दत्त मंदिर हा नाला बंदिस्त करण्याने या नाल्यामधून मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे सांडपाणी आणि पावसाळ्यातील पाणी एकत्र करुन त्यावर जलशुध्दीकरण प्रक्रिया योजना राबवून त्याचा शेतीसाठी किंवा एकाद्या बागेसाठी फेर वापर करणे शक्य होणार आहे, त्याचबरोबर या नाल्याच्या पाण्यामुळे होणारी आरोग्य हानी टाळणे शक्य होणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सी. सी. टी. व्ही. मुळे शहराची सुरक्षीतता अधिक भक्कम होणार

     सी. सी. टी. व्ही. यंत्रणा आज प्रत्येक शहराची अत्यंत आवश्यक गरज बनली असताना त्यासाठी अडीच कोटी आणि प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन इमारतीची फेर उभारणी होत असताना तेथील ध्वनीक्षेपक यंत्रणेची सुधारणा उपयुक्त ठरणारी असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

कायम दुष्काळी पट्टा कृष्णेच्या पाण्याने हरित पट्टा होत आहे

   श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची दूरदृष्टी फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी वगैरे नागरी सुविधांसाठी उपयुक्त ठरल्याचे गेल्या ३०/३५ वर्षात आपण सर्वांनीच अनुभवले आहे, तथापि त्यांच्या दूरदृष्टीला आदरणीय खा. शरदराव पवार आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची भक्कम साथ लाभल्याने फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टयासह संपूर्ण राज्यातील दुष्काळी पट्टा आज कृष्णेच्या पाण्याने हरित पट्टा म्हणून सुजलाम सुफलाम होतो आहे. शेती उत्पादनात भरीव वाढ आणि त्याला योग्य बाजार पेठ लाभल्याने बळीराजा सुखी समाधानी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments