Breaking News

फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा

Phaltan - Pandharpur railway line in the presence of Minister of State for Railways Raosaheb Danve positive discussion

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वेक्षण व भू - संपादन होऊन प्रलंबीत राहिलेला फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण करुन त्यावरुन प्रवासी व माल वाहतूक तातडीने सुरु करण्याची आग्रही मागणी माढा लोकसभा मतदार संघातील भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

         पुणे रेल्वे विभागीय कार्यालय  येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वे विषयक विविध प्रश्नांची अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने मांडणी करुन त्यांच्या सोडवणूकीसाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची मांडणी करताना या सर्व प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्याची मागणी ना. रावसाहेब दानवे यांचेकडे केली. या बैठकीस आ. राहुल कुल, पुणे डिव्हिजन मधील सर्व खासदार, आमदार, रेल्वेचे सर्व अधिकारी वर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण - पुणे मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढविणे आणि त्यांच्या वेळा प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या सोईच्या असल्या पाहिजेत अशी मागणी नोंदविताना माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वे स्थानके दुरुस्ती, सुशोभिकरण व अद्यावतीकरणा बाबत विस्तृत मांडणी करण्याबरोबर या सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षितता वाढविण्याची मागणी केल्यानंतर त्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आगामी काळात हे प्रश्न मार्गी लागतील याची खात्री झाली आहे.

    नवीन रेल्वे प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील भूसंपादन केले असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा तसेच रेल्वे मार्गा लगतच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या अडचणीबाबत त्वरित मार्ग काढण्या संदर्भात तसेच फलटण - बारामती रेल्वे मार्गासाठी भुसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी आदी विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेत माल वाहतूक सुरळीत व सोईची होऊन शेतमाल वेळेवर बाजार पेठेत  पोहोचविण्यासाठी किसान रेल्वे सुरु केली मात्र सदर रेल्वे वेळेत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीची दखल घेऊन सदर किसान रेल्वे वेळेवर पोहोचावी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

     कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याबाबत, पिंक हिल रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर सुरु करणे बाबत, दौंड - भुसावळ रेल्वे पंढरपूर पर्यंत चालू करणे बाबत, रेल्वे थांबा विषयी कारवाई त्वरित करणेबाबत या बैठकित चर्चा झाली.

No comments