Breaking News

फलटण अधिकार गृह इमारत व परिसराचे सुशोभीकरण

Phaltan Adhikargruh building and premises beautification

फलटण - फलटण येथील शासकीय कार्यालये असलेल्या संस्थानकालीन अधिकार गृह इमारत व परिसर सुशोभीकरण योजनेमध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांनी लक्ष घातल्यापासून ही  इमारत आता शासकीय कार्यालय ऐवजी कार्पोरेट ऑफिस बिल्डिंग वाटू लागली आहे.

         पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून या इमारतीची किरकोळ दुरुस्ती व नंतर संपूर्ण इमारतीला रंग देण्यात आल्याने मूळची संस्थान कालीन स्थापत्त्य कलेचा एक उत्तम नमुना असलेली ही इमारत रंग कामामुळे उठून दिसू लागली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येऊन अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. 

     कार्यालयात येणाऱ्या वाहनांसाठी वाहन तळाची सुविधा नसल्याने या इमारतीमधील न्यायालय व शासकीय कार्यालयात येणारी वाहने थेट कार्यालयापर्यंत जात असल्याने कोणत्याही कार्यालयात प्रवेशासाठी जागा शिल्लक रहात नसे, त्यासाठी न्यायालय व कार्यालय परिसरात कायम स्वरुपी बॅरेगेटिंग लावून कर्यालयापर्यंत जाणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आता सर्व वाहने अंतर्गत मुख्य रस्त्यावर लावण्यात येत आहेत, तथापि ते ही अडचणीचे ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून अधिकार गृह इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर उजवीकडे असलेल्या खुल्या जागेत ४ चाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहन तळ उभारण्याची मागणी होत असून सदर वाहन तळ ठेकेदारा मार्फत चालवून वाहनांची सुरक्षितता जपावी अशी मागणी होत आहे.

         दरम्यान या इमारती समोर संस्थान कालीन रचनेनुसार दोन्ही इमारतींच्या मध्यभागी उत्तम बागेची रचना करण्यात आली आहे, मात्र त्याकडे गेली काही वर्षे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरावस्था झाली होती. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी कमिन्स इंडिया प्रा. ली., तलाठी संघटना, नीरा उजवा कालवा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग वगैरेंच्या माध्यमातून प्रत्येकाला बागेचा एकेक भाग निश्चित करुन देवून त्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी सोपविली आहे. 

    साहजिकच प्रत्येक विभाग बागेचा आपला भाग अधिक सुशोभित असण्याबरोबर तेथे उत्तम प्रकारचे वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आता अधिकार गृह इमारतीसमोरील बाग सुशोभीकरणात एक स्पर्धा सुरु झाल्याने आगामी काळात येथे उत्तम बागबगीचा आणि मनोहारी परिसर निर्माण होणार आहे.

    दरम्यान न्यायालय आणि सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या शहर व तालुक्यातील नागरिकांना येथील वृक्ष राजीच्या सावलीत आपले काम होइपर्यंत थांबण्याची सुविधा उपलब्ध झाली असून तेथे बसण्यासाठी सिमेंट बाके ठेवण्यात आली आहेत, तसेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून स्वच्छ, शुद्ध व थंड पाण्यासाठी दोन्ही इमारतींमध्ये प्रत्येकी एकेक फिल्टर व वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत.

अधिकार गृह इमारती समोर केलेली बागेची पुनर्रचना.

     दरम्यान प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या पाठीमागील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. त्यापूर्वी या दोन्ही इमारतीमध्ये पूर्वीच्या दूरसंदेश यंत्रणेसाठी दोन उंच टॉवर उभारण्यात आले आहेत, ती यंत्रणा कधीच सक्षमपणे कार्यरत झाली नाही आणि गेल्या १०/१५ वर्षांपासून पूर्णतः बंद असूनही हे दोन टॉवर विनाकारण अडथळा ठरत आहेत, ते काढून टाकावेत अशी मागणी होत आहे.

    दरम्यान प्रस्तावित वाहन तळ तातडीने उभारन अंतर्गत मुख्य रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी टाळावी अशी मागणी होत आहे.

No comments