माझे आजोबा व वडील, माझे गुरु आणि माझी शक्ती
घरच्या कर्तबगार दोन व्यक्तींचा एकाच दिवशी कोरोनाने बळी घेतला, ही दुर्दैवी घटना फलटणच्या लिपारे कुटुंबियांसाठी फार मोठा धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी कटु प्रसंगातून लिपारे कुटुंबिय आजही सावरलेलं नाही. पण नियतीच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही, हे मात्र निश्चित. आले देवाचिया मना – तेथे कोणाचे न चालेना, या उक्तीप्रमाणे लिपारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर असतांनाही मन कठोर करुन त्यांच्या स्मृति सदैव तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. त्यांच्या विचाराचा आणि कार्यकर्तत्वाचा वसा आणि वारसा यापुढेही निरंतरपणे सुरुच ठेवणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे. त्यांच्या दि. 30 एप्रिल 2022 या प्रथम स्मृतिदिनानिमित्त एक नात म्हणून आणि एक लेक म्हणून त्यांना वाहिलेली शब्दसुमनांची श्रध्दांजली.
माझे आजोबा आणि माझे वडील यांची आज प्रथम पुण्यतिथी. देवांग कोष्टी समाज, फलटण या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि परिवार साडी सेंटर या दुकानाचे मालक कै. गणपतराव नामदेव लिपारे Ganapatrao Namdev Lipare (3 सप्टेंबर 1929 रोजी जन्म) यांचा वयाच्या 92 व्या वर्षी कोरानाने सन 2021 मध्ये मृत्यु झाला. अतिशय दुख:द घटना. त्याचबरोबर त्यांचा मुलगा म्हणजे माझे वडील कै. लक्ष्मण गणपतराव लिपारे Laxman Ganapatrao Lipare यांचाही त्याचदिवशी अवघ्या वयाच्या 59 व्या वर्षी कोरानाने मृत्यु झाला. आमच्याबाबतीत दोन्ही घटना अचानक घडल्या. अजूनही आम्ही त्यातून सावरलो नाही.
राजापूर, ता. खटाव येथून 4 थी शिक्षण घेऊन आजोबा फलटण येथे स्थायिक झाले. लहानपासूनच त्यांनी शिक्षण सोडून पडेल ते काम करण्यास सुरुवात केली. शेळी, कोंबड्या पाळून उदरनिर्वाह केला. नंतर आजोबांनी घरीच हातमाग बसविले ते व त्यांची पत्नी म्हणजे आमची आजी शांताबाई लिपारे स्वत: हातमागावर साड्या विणत. फलटणमध्येच एका कापड दुकानात आजोबा कामाला जायचे. अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत हालाखीत दिवस काढून आजोबांनी आपला कापड व्यवसाय नावारुपाला आणला. नंतर त्यांनी सन 1975 रोजी स्वत:चे कापड दुकान फलटण येथील रविवार पेठ येथे परिवार साडी सेंटर या नावाचे दुकान स्थापन केले. अत्यंत मनमिळावू, गोड बोलणे, थोडाफार उधारीवर त्यांनी व्यवसाय सुरु केला. स्वत: अगदी वक्तशीर आणि काटकसरीने आयुष्य जगणारे. घरात सगळयांना वेळेचे महत्व आणि वेळेत काम कसे करायचे याची सवय लावली.
सुरुवातीला देवांग कोष्टी समाजाची स्थापना झाल्यानंतर आजोबा हे पंच मंडळात कार्यरत होते. सन 1980 पासून चौंडेश्वरी देवीची मूर्ती प्रतिष्ठापणा ते अद्यापर्यंत ते संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सल्लागार, सर्वांना स्वत:हून सल्ला देणारे, हक्काने ओरडणारे, चुकेल तिथे बोलणारे असे व्यक्तिमत्त्व. देवांग कोष्टी समाजाला त्यांची खूप मोठी मोलाची साथ लाभली होती. वयाच्या 92 व्या वर्षी सुध्दा त्यांची तब्बेत त्यांनी व्यवस्थित ठेवली होती.
त्यांचा एककुलता एक मुलगा म्हणजे माझे वडील कै. लक्ष्मण गणपतराव लिपारे यांनाही त्यांनी त्यांच्या 12 वी नंतर आपल्या कापड व्यवसायाकडे वळविले होते. वडीलाचांही स्वभाव अगदी आजोबांसारखाच होता. कोणताही व्यवहार, निर्णय असो सर्वकाही आजोबांच्या विचारानेच. त्यांचाही स्वभाव अतिश्य प्रेमळ आणि कडकही होता. माझ्या आईनेही कधी आजोबा व आजी यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही. वडीलांनीही दुकानासाठी खूप कष्ट केले. वडीलांनी ते दुकान दोन मजली केले, दुकानात सर्व सोयी सुविधा केल्या. दिवसभर दुकानात असायचे कधी विश्रांती घेतली नाही. कधी आयुष्यासाठी वेळ वाया घालविला नाही. जसे आजोबा सांगतिल तसेच वागत राहीले. सन 1994 मध्ये घर बांधले. घरात सर्व सोयीसुविधा केल्या. माझे लाडके चलुते कै. सुहास लिपारे यांनी माझ्या वडिलांना दुकान व्यवसायात बरोबरीने साथ दिली. दुदैवाने तिघेही दोन महिन्यातच आम्हाला पोरके करुन गेली.
वडीलांना तीन अपत्य, माझ्यासह दोन मुले, आम्हाला त्यांनी खूप शिकविले, स्वत:च्या पायावर उभे करुन स्वावलंबी आणि आत्मनिर्भरतेचे धडे लहानपणीच दिले. ही त्यांची संस्काराची शिदोरी आम्हा भावंडासाठी आयुष्यभराची शिदोरीच ठरली. वडील आणि आजोबा हे नात्याने माझे आजोबा व वडील असले तरीही ते माझे खऱ्या अर्थाने गुरु असून त्यांची शिकवण आणि सल्ला मला शिरसावध्य असायचा. त्यांच्या पश्च्यात आता मी पोरकी झाले असून आता कोणाकडे जावू मी सल्ला व मार्गदर्शनासाठी हा माझा प्रश्न अनुत्तरीयच राहिला आहे.
माझ्या आयुष्यात वडिलांचा एक मोठा भाग होता. ज्याचे वर्णन करणे खूप कठीण आहे, आयुष्यात वडील असणं खूप महत्वाचे आहे, ज्यांचे वडील आहेत त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठी शक्ती व देणगी आहे. वडील हे मुलीसाठी फार मोठे नाव आणि फार मोठी ओळख आहे, पालक हे मौल्यवान रत्न आहेत, ज्यांच्या आर्शिवादाने जगातील सर्वात मोठे यश देखील मिळवता येते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वडील आणि आजोबा माझ्याबरोबर राहिले आणि माझ्या सर्व निर्णयांमध्ये मला साथ दिली, त्यामुळेच मी आज सुखी, समाधानी आहे. आज मी दु:खी मनाने आजोबा आणि वडीलांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करते.


No comments