Breaking News

रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही – शालेय शिक्षणमंत्री

There is no fact in the news that a paper on chemistry has been leaked - Minister of School Education

    मुंबई  : मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

    शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. याबाबतची वस्तुस्थिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितली. इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार १० मिनिटे अगोदर म्हणजे १०.२० वा. प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण १०.३० वा. सुरू करण्यास सांगितले जाते. विले-पार्ले केंद्र क्रमांक ३६०१, मुंबई येथील केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर १०.२४ वा. प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सअॅपद्वारे काही भाग प्राप्त झाल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत. अध्यक्ष, एसएससी बोर्ड यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच १०.२० वा. नंतर मोबाईलवर आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रसायनयशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

No comments