सातारा येथील वकीलावर प्राणघातक हल्ला ; फलटण वकील संघाकडून निषेध व कामकाज बंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ मार्च - सातारा येथील वकील राम मोहन खारकर हे दि. १२ मार्च रोजी रात्री कामकाज संपल्यानंतर आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना, रस्त्यामध्ये लावलेली गाडी काढायला लावली, या कारणावरून पाच ते सहा अज्ञात इसमांनी लोखंडी रॉडने वकिलांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. झालेल्या मारहाणीत अॅड. खारकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाल्याने डोळा निकामी झाला आहे, पुढील उपचारासाठी खारकर यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अॅड. खारकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील वकील संघटनांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. फलटण वकील संघाने देखील दि.१४ मार्च रोजी बैठक घेऊन, मारहाणीचा निषेध करून, न्यायालयीन कामकाज बंद ठेवले असल्याची माहिती फलटण वकील संघाचे अध्यक्ष अॅड.शेडगे यांनी दिली आहे.
फलटण वकील संघाच्या वतीने बैठक घेऊन, निषेध व्यक्त केल्यानंतर, न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याबाबत फलटण येथील मुख्य न्यायाधीश, फलटण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सातारा येथील अॅड. राम मोहन खारकर यांचेवर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे सातारा जिल्हा न्यायालयील वकील संघ व सातारा जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयातील चकीलांनी आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद ठेवणेचा निर्णय घेतलेला आहे. त्याबावत दिनांक १४ मार्च २०२२ रोजी फलटण वकील संघ यांचे वतीने घेणेत आलेल्या मिटींगमध्ये आज दिनांक १४ मार्च २०२२ रोजीचे न्यायालयीन कामकाज बंद ठेवणेबाबत निर्णय घेणेत आलेला आहे.
तरी दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सातारा येथील अॅड. राम मोहन खारकर यांचेवर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे दिनांक १४ मार्च २०२२ रोजींचे न्यायालयीन कामकाज बंद ठेवणेत यावे.
No comments