माती व पाणी परीक्षण एकरी उत्पादन वाढीस सहाय्यभूत ठरेल : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : माती व पाणी परिक्षणाद्वारे आवश्यक तेवढ्याच खतांचा वापर उत्पादन खर्च कमी करण्यास आणि एकरी उत्पादन वाढीस सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आज वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती परवडत नसल्याची तक्रार दूर होईल अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने कृषी संकुलात उभारण्यात आलेल्या अद्ययावत माती व पाणी परीक्षण प्रयोग शाळेचे उदघाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य सर्वश्री भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, शिरिषभई दोशी, हेमंत रानडे, रणजित निंबाळकर, संजय भोसले, आर. एच. पवार, सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव चौधरी, सुहास निकम, चंद्रकांत कदम, हेमंत भोसले, मुकुंद धनवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी व माती परिक्षणाद्वारे ज्या जमिनीत पीक घेतले आहे, त्या जमिनीत असलेली विविध प्रकारची अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये व जमिनीत असलेली अन्नद्रव्ये याचा तुलनात्मक अभ्यास करुन पिकासाठी आवश्यक असतील तेवढीच अन्नद्रव्ये वरखताद्वारे दिल्याने जादा वरखतांचा खर्च तर वाचतोच त्याशिवाय एकरी उत्पादन वाढ आणि जादा रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडून एकरी उत्पादनावर होणारा अनिष्ट परिणाम टाळणे शक्य असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देत माती व पाणी परीक्षण करुनच वर खतांचा वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
पारंपारिक शेती तंत्र निश्चित चांगले आहे, परंतू अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यापेक्षा अधिक लाभदायी असल्याने आता त्याचा स्वीकार करणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत नव्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा आपण येथे उभारली आहे, अशा प्रकारची अत्याधुनिक प्रयोगशाळा नसल्याने अनेक शेतकरी सातारा किंवा बारामती येथे जात असत आता ती अडचण दूर झाल्याने सर्वांनी त्याचा लाभ घेऊन लाभदायी शेती करावी असे आवाहन करतानाच या तंत्रज्ञानाची माहिती व अत्याधुनिक यंत्र सामुग्री हाताळण्याचे ज्ञान असलेल्या डॉ. प्राजक्ता खरात मेटकरी यांची प्रयोगशाळा विभागासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
दराची हमी व अन्य बाबींमुळे ऊसाचे पीक सर्वार्थाने उपयुक्त व फायदेशीर ठरत आहे, तथापी सर्वांनी केवळ ऊस पीक घेतले तर त्याच्या गाळपासाठी पुरेशी यंत्रणा नसेल तर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे आपण आजच अनुभवत आहोत, ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले तर काय होईल असा विचार त्याच बरोबर अन्य पिके घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन माती व पाणी परिक्षणाबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारुन फायदेशीर शेती करण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
संस्थान काळापासून श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी या तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांच्या हिताला सतत प्राधान्य दिल्याचे निदर्शनास आणून देत साखरवाडी साखर कारखान्याची उभारणी झाल्यानंतर दर्जेदार ऊस बियाणे आणि ऊस पिकासंबंधी संशोधन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्वकाळात संस्थानच्या मालकीची जमीन व अन्य मदत करुन श्रीमंत महाराज साहेब यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची उभारणी केली, शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे तंत्रज्ञान समजले पाहिजे, ही मुले कृषी पदवीधर झाली पाहिजेत या उद्देशाने श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर खूप प्रयत्न केले मात्र शासनाने या महाविद्यालयांना त्यांच्या हयातीनंतर परवानगी दिली, तथापी त्यांनी शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी विषयक शिक्षण दिले, त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टयात कृष्णेचे पाणी पोहोचल्याने आता तालुका १०० % बागायत होत असताना ऊसा बरोबर अन्य पिकेही दर्जेदार उत्पादन देतात, लाभदायी ठरतात याचा अभ्यास करुन योग्य प्रमाणात खते, पाणी वापरुन एकरी अधिक उत्पादन घ्या, त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, मार्गदर्शन, अत्याधुनिक औजारे उपलब्ध करुन देण्यासाठी या दोन्ही महाविद्यालयांशी संपर्क ठेवा सर्वांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य निश्चित लाभेल याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात शेतकरी मार्गदर्शन व कृषी विषयक प्रशिक्षण याबाबत आपण सतत प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी येथील यंत्रणा, तंत्रज्ञान व अत्याधुनिक प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रयोगशाळा व्यवस्थापिका डॉ. प्राजक्ता खरात मेटकरी यांनी खत व पाण्याचे नमुने घेण्याची पद्धती, नमुने तपासणी अहवालाची उपयुक्तता, खतांचा योग्य वापर आणि या सर्वाबाबत शेतकऱ्यांना होणार असलेले मार्गदर्शन याबाबत सविस्तर विवेचन केले.
आर. एच. पवार यांनी माती व पाणी परिक्षणाबाबत आर. सी. एफ. कंपनीने विकसीत केलेल्या तंत्रज्ञान विषयक संगणकीय यंत्रणेची माहिती देवून सदर सॉफ्ट वेअर या प्रयोग शाळेला मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रा. रासकर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

No comments