Breaking News

खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नाने फलटणला पासपोर्ट ऑफिस ; केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली ग्वाही

शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलताना केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान

Passport office at Phaltan through Ranjitsingh's efforts; Testimony given by Union Minister of State for Communications Devusingh Chouhan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ मार्च - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदार संघातील नागरिकांसाठी फक्त पाणी - रेल्वे - लाईट व रस्ते आदी  प्रश्न सोडवण्यात पुढे असतात, असे नाही तर मतदारसंघातील नागरिकांच्या इतर सुविधांकडे ही ते लक्ष देत असतात.  पासपोर्ट काढण्यासाठी फलटणच्या नागरिकांना सातारा, पुणे किंवा सोलापूरला जावे लागते, तर ती सुविधा फलटणकरांना इथेच मिळावी, त्यासाठी फलटणला पासपोर्ट ऑफिस सुरू करावे अशी मागणी खासदार रणजितसिंह यांची होती, या मागणीचा विचार करून फलटण येथे पासपोर्ट ऑफिस सुरू  करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी दिली.

    शायनिंग महाराष्ट्र २०२२ या महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभ व भाजपाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात  केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर, सोलापूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अनुप शहा, सुशांत निंबाळकर, नानासो इवरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व केंद्र, राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी तसेच स्वराज फौंडेशन व सांसा फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.

    भाजपाचे कोणतेही पद हे सन्मान मिळवण्यासाठी नसते तर ते सेवा करण्यासाठी असते त्याप्रमाणेच, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चार वर्षात सेवा करून मतदारसंघाचा विकास केलेला आहे. आणि या देशांमध्ये एक आदर्श खासदारांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आदर्श खासदार म्हणूनच संपुर्ण देशामध्ये ओळखले जाते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी कायम आग्रही असतात असे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी काढले.

      २५ हजाराहून जास्त नागरिकांनी या महाप्रदर्शनास भेट देऊन केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना समजून घेतल्या. शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनात मागील ३ दिवसांपासून ज्यांनी योगदान दिले त्या सर्व एनजीओ व पदाधिकाऱ्यांना ना.चौहान यांनी धन्यवाद दिले.

    कोरोना महामारी मध्ये साडे नऊ महिने कठोर परिश्रम करून आपल्या वैज्ञानिकांनी लसीची निर्मिती केली, त्यासाठी केंद्र सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. प्रतिबंधक लसीची निर्मिती करणे हे सोपे काम नव्हते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस भारतामध्ये तयार व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले व कोरोनाची लस म्हणजेच कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन या लसी भारतामध्ये तयार करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या वतीने या लसीचे मोफत डोस सर्व नागरिकांना देण्यात आले. त्याचबरोबर कोरोना महामारीत देशामधील जनतेचे भुकेमुळे हाल होऊ नयेत, याचीही विशेष दक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असल्याचे देवूसिंह चौहान यांनी यावेळी सांगितले.

    या प्रदर्शनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी योजलेल्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना घेता आली.  केंद्र सरकारच्या आयुष, शेती, पोस्ट, दूरध्वनी, नाबार्ड, वैज्ञानिक, ग्रामोद्योग या सर्वच क्षेत्रातील योजनांची माहिती नागरिकांना घेता यावी यासाठीच आपण या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

    मी खासदार झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्र्यांनी मला सहकार्य करुन, माढा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून माढा मतदारसंघात हायवे, आंतरराज्य रस्ते, बुलेट ट्रेन व इतर रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. त्यामुळे या भागाचा विकास कोणीही रोखू शकत नाही. माढा मतदार संघात इतके काम झाले आहे की, भविष्यात माढा मतदारसंघ रोल मॉडेल म्हणून पुढे येईल असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रदर्शित केले.

    नूतन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करताना सातारा जिल्ह्यातील आठ ही आमदार भाजपाचे निवडून आले पाहिजेत, तसेच येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या तसेच जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली करूयात, भारतीय जनता पार्टी यापुढच्या सर्व निवडणुका या ताकतीने लढवणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

    कुणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरीही, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है। वही होता है, जो मंजूरे ख़ुदा होता है। ही हिंदीतील शायरी ऐकवत, अडचणीत आणणाऱ्यांना, आमच्याबाबत कोणी कितीही ग्रहण लावायचा प्रयत्न केला तरी, तो यशस्वी होणार नसल्याचे स्पष्ट करत, कोणाही आंडू पांडूने माझा नाद करू नये असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.

     माढा लोकसभा मतदार संघाच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रा. सतीश जंगम यांनी केले. प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले तर आभार अनुप शहा यांनी मानले.

No comments