शिंपी समाजाने आपली संघटीत शक्ती निर्माण करावी - अॅड. विश्वनाथ टाळकुटे
सत्कार सोहोळा संपन्न झाल्यावर अड. टाळकुटे यांच्या समवेत सत्कार मूर्ती व समाजबांधव. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : फलटण शहर व तालुक्यात शिंपी समाज मोठ्या संख्येने असून सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली संघटीत शक्ती निर्माण करावी, त्याद्वारे समाजाचे अनेक सार्वजनिक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी व्यक्त केला आहे.
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त सहभागाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल संजय जामदार, दर्पण पुरस्कार प्राप्त सुभाषराव भांबुरे आणि ट्रस्टचे कृतिशील अध्यक्ष विजय उंडाळे यांच्या यथोचित सत्कार व शुभेच्छा समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना अॅड.टाळकुटे बोलत होते. यावेळी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, सुनील पोरे, राजेंद्र कुमठेकर, शेखर हेंद्रे, राजाभाऊ गाटे, संतोष बाचल, राम गाणबोटे, रामकृष्ण जामदार, देवेंद्र हेंद्रे, नितीन चांडवले, प्रकाश टाळकुटे, अंजली कुमठेकर, धनश्री पोरे, कल्पना टाळकुटे, स्मिता हेंद्रे, वसुधा भांबुरे, सौ. जामदार यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
समाजात प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करीत असतो, त्याचबरोबर स्वतः ची प्रतिभा संपन्न करण्याच्या प्रयत्नात असतो, त्याप्रमाणे संजय जामदार यांनी अध्यत्मिकते कडे वळून ५५०० कि. मी. 'नर्मदा परिक्रमा' सारखी अवघड यात्रा पूर्ण केली, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे यांना मिळालेला राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार त्यांच्या या क्षेत्रातील उज्वल कार्याची पावतीआहे, आणि शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे यांनी उत्तम प्रकारे संभाळलेली अध्यक्ष पदाची धुरा मंदिरामध्ये आवश्यक ते चांगले बदल घडवून आणले असल्याचे सांगत ऍड टाळकुटे यांनी या सर्वांच्या कार्याचे कौतुक केले.
या सर्वांनी समाजाप्रती असलेली आपली भावना आपल्या कार्यातून प्रकट केली असून त्यांचा कौतुक सोहळा होणे क्रमप्राप्त होते यामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेश हेंद्रे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे यांनी परिश्रम घेऊन सत्कार सोहळा पार पडला ही बाब कौतुकास्पद असल्याचे ऍड टाळकुटे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी पत्रकार संजय जामदार यांनी अतिशय कष्टदायी अशी ५५०० की. मी. ची नर्मदा परिक्रमा धाडसाने सायकल वरुन पूर्ण केली, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे यांनी संस्थेचे कार्य उत्कृष्ट केले याबद्दल शिंपी समाज व शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने संयुक्तिक सत्कार सोहळा जेष्ठ विधीज्ञ अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांचे हस्ते करण्यात आले. राजेश हेंद्रे यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले तर महिला मंडळ अध्यक्षा सौ. पदमा टाळकुटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. शेवटी आभार शेखर हेंद्रे यांनी मानले.
No comments