खा. रणजितसिंह यांनी ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली - दिगंबर आगवणे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ मार्च : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वराज ॲग्रो इंडिया ॲग्रो लि. कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली ४ कोटी ४० लाखांची फसवणूक केली असल्याने खा. रणजितसिंह व सर्व संचालकांविरुध्द विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे व फसवणूकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुर उद्योगाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी पोलिस प्रशासनाकडे अर्जाद्वारे केली आहे. सदर घटनेमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, २००७ सालापासून रणजितसिंह यांच्याशी आपला संपर्क आला. डेअरीच्या बॉयलरसाठी त्यांना लाकडे पुरवीत असल्याने आमच्यात आर्थिक व्यवहार होत होते. खा. रणजितसिंह यांना कारखाना उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने २०१४ च्या दरम्यान त्यांची पिंपळवाडी येथील जमिन गहाण ठेवत त्यांच्या कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी व कारखान्याचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी वेळोवेळी मोठ्या रकमेचे कर्ज खा. रणजितसिंह व संचालकांनी बँकांच्या संमतीने काढले. घनिष्ट संबंधापोटी सदर कर्जासाठी आपली जमिन गहाण ठेवली आहे. कारखाना सुरु झाल्यानंतर कोजन (वीज निर्मिती) बाबत व त्याच्या उत्पन्नाबाबत तोंडी व्यवहार झाला. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने आपण नांदल, गिरवी येथील जमिनी गहाण ठेवून कर्ज काढले, त्याची रक्कम आरटीजीएसद्वारे रणजितसिंह यांच्या खात्यावर जमा केली आहे.
नोव्हेंबर २०१७ साली आयूर ट्रेडर्स कंपनीच्या खात्यातून स्वराज कारखान्याच्या खात्यावर बग्यास खरेदीसाठी पाठविलेल्या रकमेचे मला बग्यास मिळाले नाही. प्रत्यक्षात खासदारांनी टर्न ओव्हर व फायदा दाखवण्यासाठी त्यांनी मला ७ ते ८ कोटी रुपयांची खोटी बीले देत माल विक्री केल्याचे दाखविले. सदर कंपनी २०१८ साली आगीत भस्मसात होवून माझे ७ कोटींचे नुकसान झाले. त्यावेळी खा. रणजितसिंह यांनी खोट्या बिलांचा माल कंपनीत दाखवून विम्याचा क्लेम करण्यासाठी धमकावले होते. खासदार हे स्वराज पतसंस्थेचे चेअरमन असल्याने त्यांनी २०१३ साली पत्नीच्या पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी माझ्या नावे कर्ज काढले होते. २०१६-१७ साली आपल्या वाद सुरु असलेल्या सुरवडी येथील जमिन खासदारांनी गहाण ठेवत मोठे कर्ज घेतले. सदर प्रकरणात आपल्या सह्या असल्या तरी मला रक्कम मिळाली नाही. त्यापैकी त्यांच्या कारखान्याने परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेत भरल्याचे मला समजले आहे.खा. रणजितसिंह यांना दिलेल्या कर्जापायी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव काढल्याची नोटीस बँकेकडून मला मिळाली आहे.
सदर प्रकारामुळे खा. रणजितसिंह व स्वराज कारखाना व पतसंस्था यांचे सर्व संचालक यांनी संगनमताने विश्वासघात करुन फसवणूक केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा. रणजितसिंह हे भाजपचे खासदार असल्याने ते पदाचा गैरवापर करुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता व्यक्त करुन त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचेही दिगंबर आगवणे यांनी नमूद केले आहे.
No comments