Breaking News

दिगंबर आगवणेचे आरोप निराधार ; दिगंबर म्हणजे मिस्टर नटवरलाल - खा.रणजितसिंह

Allegations of Digambar coming are baseless- MP Ranjitsinh Nike Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ मार्च :  दिगंबर आगवणे यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार आहेत. दिगंबर आगवणे याच्यावर दाखल असलेले दावे, त्याचे आम्ही भरलेले चेक, आणि आता स्वराज कारखाना त्याच्यावर करत असलेली कारवाई थांबवण्यासाठी त्याने केलेला हा व्यर्थ खटाटोप आहे. दिगंबर आगवणे याने एकच प्रॉपर्टी २ ते ३ बँकांना तारण दिल्या आहेत.  त्यामुळे विविध बँका अडचणीत आलेल्या आहेत.   साडेतीन एकरावर कोणती बँक दोनशे कोटीच्या वर कर्ज देते असा सवाल करून दिगंबर आगवणे हा सध्याच्या काळातील मिस्टर नटवरलाल आहे अशी टिका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

  हॉटेल निसर्ग  सुरवडी, ता. फलटण  येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. 

    यापुर्वीच्या आमदारकीला दिगंबर आगवणेला जी मते मिळाली ती फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच मिळाली आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकांना तारण ठेवलेली आहे. त्यामुळे विविध बँका अडचणीत आलेल्या आहेत. दिगंबर आगवणे यांनी विविध बँकाना यापुर्वीच फसवले आहे. दिगंबर आगवणेस पुर्वी जी मदत केली ती चांगल्या भावनेनेच केली होती. दिगंबर आगवणेचे आरोप बिनबुडाचे आहेत. दिगंबर आगवणेना जे पैसे दिलेले आहेत ते चेक व बँकेद्वारेच दिले आहेत. आगवणेवर विश्वास ठेवला पण तो माणुसच बोगस निघाल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. 

    दिगंबर आगवणे यांना यापूर्वी स्वराज पतसंस्थेमधुन कर्ज दिलेले होते. त्यांस पुन्हा पैश्याची गरज भासल्याने त्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढले व त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही, असेही खासदार निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आगवणे ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले होते, त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. व त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेले होते. तर ते कर्ज बोगस कर्ज कसे होईल, असा सवाल ही खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला.

      दिगंबर आगवणे यांच्याकडून मला साधारण आठ कोटी येणे आहेत. त्यामुळे त्याचे सुमारे दोन कोटी रुपये आम्ही होल्ड केले आहेत. आठ कोटी मधुन दोन कोटी वजा करता सुमारे सहा कोटी त्यांच्याकडूनच येणे आहे. याबाबत सविस्तर माहिती पुराव्यानीशी जिल्हा पोलीस प्रमुख यांना आपण दिली आहे.

    दिगंबर आगवणेंना माझ्याविरुध्द जर कोण अंतर्गत मदत करत असेल तर ते मला माहिती नाही. पण त्यास मदत केल्याचे परिणाम मी भोगत आहे. आता जो मदत करत असेल तर  तो त्याचे परिणाम नक्कीच भोगेल असा  टोलाही खा. रणजितसिंह यांनी यावेळी लगावला.

No comments