Breaking News

राष्ट्रीय दुखवट्यात फलटण नगर परिषदेने राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला नाही

In the national tragedy, Phaltan Municipal Council did not lower the national flag in half

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)दि. ७ फेब्रुवारी -  भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र शासनाने व राज्य शासनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला, व तशी अधिसूचना सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वत्र प्रसारित केली होती, परंतु फलटण नगरपरिषदेच्या प्रशासनाने या अधिसूचनेचे पालन न करता, जुन्या इमारतीसमोरील  राष्ट्रध्वज अर्ध्यावर न उतरवता दि.७ फेब्रुवारी रोजी दिवसभर फडकवत ठेवल्याने सर्वत्र आश्चर्य केले व्यक्त केले जात आहे.

     भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता व राज्य शासनाने देखील दुखवटा म्हणून  सोमवार दि. ७ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. दुखवटा कालावधीत राष्ट्रध्वज नेहमी प्रमाणे न फडकविता तो ध्वजदंडाच्या अर्ध्यावर आणला जातो, आणि शासनाने काढलेल्या अधिसूचनेत  दि. ६/२/२०२२ ते दि. ७/२/२०२२ दरम्यान, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख केला असतानाही, आज फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात असणारा राष्ट्रीय ध्वज नेहमी प्रमाणे फडकत होता. परंतु याबाबत प्रशासनातील कोणाच्याही लक्षात आले नसल्याने व या प्रकाराबाबत जबाबदार अधिकारी मात्र दुसऱ्याकडे बोट दाखवून आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचेही चित्र या निमित्ताने दिसुन आले. या प्रकाराबाबत फलटण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क केला असता आपण त्याबाबत जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्यांना या प्रकाराबाबत विचारणा करीत असल्याचे सांगितले.  

        राष्ट्रीय दुखवट्यासारख्या प्रसंगात फलटण नगर परिषदेचा राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर न उतरवल्यामुळे, आज सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते. 

No comments