Breaking News

फलटण- पंढरपूर रेल्वेसाठी निधीची तरतूद करावी ; खासदार रणजितसिंहांची पंतप्रधानांकडे मागणी

Funding should be provided for Phaltan-Pandharpur Railway; MP Ranjit Singh's demand to the Prime Minister

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी -: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माढा मतदारसंघातील फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्ग मंजुरी व निधी उपलब्ध करुन प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. काही आडमुठे राजकारणी व महाराष्ट्र शासनही या योजनेस सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत, म्हणून या विषयी मार्ग काढून केंद्र सरकारच्या निधीसह हा प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली, तसेच मतदार संघातील पाणी प्रश्नाबाबतही चर्चा झाली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कळवले आहे. 

    माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन, प्रलंबित विकास कामांच्या पूर्ततेबाबत मागील संदर्भासह सविस्तर चर्चा केली. यावेळी आ. सदाभाऊ खोत व आ. जयकुमार गोरे उपस्थित होते.

    बैठकीदरम्यान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची "गड व किल्ले संवर्धन" समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणजितदादांचे अभिनंदन व गौरव करून त्याच्या कार्यपूर्तीस  शुभेच्छा दिल्या.

    या बैठकीत फलटण- पंढरपूर रेल्वे व पाणीप्रश्न बाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच  पंतप्रधान मोदी साहेब यांच्या जिव्हाळ्याचा जिहे-कठापूर (गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन प्रकल्प) अंतिम टप्प्यात आला आहे. तो पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी बाबत पंतप्रधानांशी  सकारात्मक चर्चा झाली आणि हा प्रकल्प निधीसह त्वरित कार्यान्वित करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती खासदार रणजितसिंह यांनी दिली.

No comments