बोगस प्लॉट विक्री ; ७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ फेब्रुवारी - दुसऱ्याच्या मालकीचा प्लॉट दाखवून, त्याची विक्री करताना वेगळ्या चतु:सीमा टाकून बोगस प्लॉटचा खरेदीदस्त करून देऊन, १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ७ जणांविरुध्द फलटण शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज बाळासाहेब शिंदे वय ४३ रा. भाडळी बु. ता. फलटण यांचे नातेवाईक महादेव तुकाराम यादव मुळ रा. शिंदेवाडी ता. फलटण, हल्ली मुक्काम हैदराबाद ( तेलंगणा ) यांना प्लॉट घ्यायचा होता. कोळकी ता. फलटण येथे त्यांना दुर्योधन किसन सावंत रा. पवनहंस कॉम्प्लेक्स रिलीफ वेस्ट मुंबई, सुनिल दादासो सोनवलकर रा. वडले ता. फलटण, संग्राम धनाजी नाळे रा. वनदेवशेरी, कोळकी, संजय वसंत काळे रा. कोळकी ता. फलटण, दीपक शिवाजी साळूंखे रा. कोळकी, दिनेश निवृत्ती कसबे रा. कोळकी, सागर संजय काकडे रा. कोळकी ता. फलटण यांनी शिंदे व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादीत करुन दहिवडी रोडलगत कोळकी ता. फलटण येथील सर्व्हे नंबर ४५/२/ड मधील प्लॉट नंबर २ हा चार गुंठ्यांचा प्लॉट दाखवीला. सदर प्लॉट त्यांचाच आहे असे भासवुन त्यांनी तो महादेव यादव यांना दस्त क्रमांक ११०९/२०१८ अन्वये २८ लाख ६० हजार रुपयांना दिला. सदर प्लॉटचा ताबा घेण्यास ते गेले असता, तो दुसऱ्याचा असल्याचे लक्षात आले. त्याच बरोबर दाखवलेला प्लॉट वेगळा व खरेदी दस्तात नमूद प्लॉट वेगळा दिसून आला, त्याच्या चतु:सीमा ही वेगळ्या देण्यात आल्या होत्या, झालेल्या दस्ताप्रमाने संबधितांनी दिलेला प्लॉटही जागेवर नसल्याचे लक्षात आले. सदर प्रकारामुळे शिंदे व यादव यांनी संबंधीतांना दिलेले पैसे परत मागितले. पैसे मागणीच्या तगाद्यामुळे त्यांना २८ लाख ६० हजार रुपयांपैकी १० लाख ८५ हजार रुपये परत करण्यात आले. परंतू उर्वरित १७ लाख ७५ हजारांची रक्कम त्यांना १ मे २०१८ ते आजपावेतो वारंवार मागुनही ती न देता फसवणूक केली. त्यामुळे दुर्योधन किसन सावंत, सुनिल दादासो सोनवलकर, संग्राम धनाजी नाळे, संजय वसंत काळे, दीपक शिवाजी साळूंखे, दिनेश निवृत्ती कसबे, सागर संजय काकडे यांच्याविरुध्द फसवणूकीसह अन्य कलमांन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद धर्मराज शिंदे यांनी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहेत.
No comments