Breaking News

मोहन मस्कर- पाटील यांना साश्रूनयनांनी निरोप ; चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार

Funeral of Mohan Maskar-Patil at Chinchewadi

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जानेवारी - साताऱ्याच्या पत्रकारितेत स्वत:चे अनोखे वलय निर्माण केलेल्या पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदविकाराच्या  तीव्र झटक्याने गुरुवारी दुपारी निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी या 'अक्षरक्रांती', 'पत्रयोद्ध्या'ला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, रक्षाविसर्जन विधी सोमवारी (दि. ३१) सकाळी ९.३० वाजता चिंचेवाडी येथे होणार आहे.

    मोहन पाटील यांनी सातारा जिल्ह्यात तब्बल दोन दशके पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांचे जन्मगाव सांगली जिल्हा असून, त्यांची कर्मभूमी सातारा जिल्हा ठरली. त्यांनी तरुण भारत, लोकमत, पुण्यनगरी या दैनिकांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना अनेक प्रश्नांना वाचा फोडली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, आरोग्य, प्रशासकीय आदीसह विविध क्षेत्रात त्यांनी केलेले लेखन समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे. अभ्यासपूर्ण वृत्तलेखनामुळे ते सर्वामान्य ठरले. राजकारण, चळवळी आदीसह बहुतांश क्षेत्रात त्यांचा लोकसंग्रह अफाट होता.

    त्यांना गुरुवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांना पुन्हा हृदयविकाराचे झटके आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या दरम्यान, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

    रात्री उशीरा पार्थिव चिंचेवाडी येथे नेण्यात आले. तेथील स्मशानभूमीत त्यांच्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी उपस्थितीत जनसमुदायाने साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक शिंदे, सुजित आंबेकर, चंद्रसेन जाधव, संपत जाधव, संतोष पवार, प्रवीण शिंगटे, संतोष कदम, संतोष जाधव, दीपक यादव, गजानन चेनगे, अरुण जावळे, स्वप्नील शिंदे, निखिल मोरे, सुहास राजेशिर्के, दादासाहेब ओव्हाळ, डॉ. प्रशांत पन्हाळकर, दत्तात्रय धनावडे, चिन्मय कुलकर्णी, चैतन्य दळवी, अमोल पवार, दत्ता पवार, जयवंत कांबळे आदी उपस्थितीत होते. दरम्यान, चिंचेवाडी येथे शोकसभा घेवून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी साताऱ्यातून उपस्थितीत पत्रकार, कार्यकर्ते आणि चिंचेवाडी ग्रामस्थांची श्रध्दांजली वाहणारी भाषणे झाली.  

No comments