Breaking News

शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्ता व आरोग्य संवर्धनासाठी जवसाचे पिक घ्यावे - गुरुदत्त काळे

Farmers should cultivate linseed for economic well-being and health promotion

    सातारा   (जिमाका) :  जिल्ह्यात जवस पिकासाठी पोषक वातावरण असून आर्थिक सुबत्ता व आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी जवसाचे पिक घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले.

    अखिल भारतीय समन्वयित जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर यांच्यामार्फत कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यावतीने चिंचणेर वंदन व चिंचणेर निंब ता. सातारा येथे जवस पिकाचे प्रथम रेषिय प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी श्री. काळे बोलत होते. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, कृषी विज्ञान केंद्राचे भुषण यादगीरवार डॉ. महेश बाबर, अखिल भारतीय समन्वयित जवस संशोधन प्रकल्प नागपूरचे डॉ. जीवन कतोरे, डॉ. बिना नायर, आत्माचे सुनिल साबळे उपस्थित होते.

    जवस पिकाचे क्षेत्र सातारा जिल्ह्यात भरपूर प्रमाणात वाढेल व जवसापासून विविध मुल्यवर्धीत पदार्थ सुद्धा महिला बचत गटामार्फत बनवून बाजार पेठ मिळवून देण्यात येईल. तसेच  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या जवसाची विक्री व्यवस्था सुद्धा करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. काळे यांनी यावेळी दिले.

    श्री. धुमाळ यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उत्पादित जवस खरेदी करुन पुढच्या वर्षी बियाणासाठी वापरु असे सांगितले.

    सर्वात स्वस्त व सर्वात जास्त ओमेगा 3 असणारे जवस हे एकमेव पिक असून जवसामध्ये 38 टक्के तेलाचे प्रमाण असून दररोज 4 ते 6 ग्रॅम जवस खाल्यास सर्व रोगाकरीता प्रतिकारशक्ति वाढविण्याचे काम करत असल्याचे   डॉ. नायर यांनी  सांगितले.

    पीक प्रात्यक्षिका प्रसंगी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

No comments