Breaking News

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले अभिवादन

Energy Minister Nitin Raut greets the historic victory pillar at Koregaon Bhima

       पुणे- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ ऐतिहासिक असून पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

    डॉ. राऊत यांनी वढु बु. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांचे समाधी स्थळांना भेटी देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश लिलोठिया, राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्या.थूल, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, उपाध्यक्ष सुजित यादव, शहर अध्यक्ष शिलार रतनगिरी उपस्थित होते. या परिसरात फिरत असताना हजारो लोकांनी त्यांना 'जयभीम' म्हणत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी आंबेडकरी तरुणांनी एकच गर्दी केली.

    "या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करताना मला विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा  स्तंभ शौर्याचे प्रतीक आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमीसारखाच भीमा कोरेगाव स्मारकाचा विकास करण्यात येईल," अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

    या परिसराच्या विकासात न्यायालयीन खटल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, अशी घोषणा त्यांनी केली.

     वढू येथे  यावेळी वीर गोविंद गोपाळ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी गायकवाड यांच्या कुटुंबियांसोबतच मोठया संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रेही घेतली.

यानंतर लोणीकंद येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेद्वारा आयोजित खिचडी वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभला मानवंदना करण्यास आलेल्या समाज बांधवांना  खिचडी व पाणी वाटप केले.

हायमास्ट उभारणीनंतर आता विद्युत वाहिन्या भूमिगत होणार

 वढु बु. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समधीस्थळ व वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांचे समाधी स्थळ परिसरात असलेल्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश यावेळी डॉ  राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्यावेळेस या परिसराला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांना या परिसरात हाय मास्ट दिव्यांची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भीमा कोरेगाव परिसर, वढू बुद्रुक येथील समाधी परिसर येथे हायमास्ट दिवे तात्काळ उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वढू गावात नियमित वीज पुरवठा खंडीत झाल्यास रिंगफिडर या पर्यायी व्यवस्थेद्वारे आपत्कालीन वीज पुरवठ्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. समाधी परिसरातील वीज वितरण व्यवस्थेची नियमित देखभाल केली जात असून या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांची क्षमता वाढ करण्यात आली आहे.        

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही केले अभिवादन

     तत्पूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही जयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.

No comments