Breaking News

फलटणमध्ये विमानसेवेसह, बुलेट ट्रेन आणण्याचा प्रयत्न - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

Attempt for bullet train with airline in Phaltan - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदार झाल्यापासून  मतदार संघातील प्रलंबित कामे करण्याचा धडाका सुरु केला असून, कोरोनामुळे त्यात थोडासा व्यत्यय आला होता, परंतु आगामी काळात, खासदारकीच्या कारकिर्दीतच फलटणच्या विमानतळावरून विमान टेक ऑफ करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन  सस्तेवाडी येथून वळवण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यामुळे मुबंई व हैद्राबाद हे अंतर फलटण मधून फक्त 40 ये 50 मिनिटात कापता येणार आहे. त्याचबरोबर फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण - पुणे - मुंबई मार्गावर रेल्वे सेवा,  फलटण शहर राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसीत करण्याचा आपला प्रयत्न आहे.  रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच फलटण हवाई मार्गाने जगाशी जोडण्याचा मनोदय व्यक्त करीत त्यासाठी आगामी काळात फलटण येथे  विमानतळ आणि येथून हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

       फलटण   येथील भारतीय जनता पक्ष संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते उपस्थित होते.

      फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण - पुणे - मुंबई मार्गावर रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन - फलटण मार्गे वळविणे, फलटण शहर राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसीत करणे आणि फलटण येथून विमानसेवा सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

      फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग हा १४०० कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्यापैकी ५० % हिस्सा राज्य सरकारने उचलावा अशी अपेक्षा आहे, आतापर्यंत केंद्राने ३ वेळा याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे, वास्तविक या रेल्वे मार्गाचा लाभ जसा भाविकांना होणार आहे तसा शेतमाल व औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने राज्याच्या हिताच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे  निदर्शनास आणून दिले, त्याचबरोबर राज्य सरकारने नकार कायम ठेवल्यास आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाची पूर्तता करणार असल्याची ग्वाही खा. नाईक निंबाळकर यांनी दिली.

     लोणंद - फलटण - बारामती या रेल्वे मार्गापैकी लोणंद - फलटण मार्गावर रेल्वे सेवा सुरु झाली आहे, तथापी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ती बंद असली तरी लवकरच सुरु होईल याची खात्री देत फलटण - लोणंद - पुणे - मुंबई अशी रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन दहिगाव येथून टर्न घेणार आहे, त्याऐवजी सस्तेवाडी येथून वळविता आल्यास फलटणकरांना त्याचा लाभ घेता येणार असल्याने त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, फलटण शहरातून आळंदी - पंढरपूर - मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याचे  भूमीपूजन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे, सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चाचा आणखी एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग फलटण शहरातून जाणार असून लवकरच त्याच्या मार्ग व प्रत्यक्ष कामाची घोषणा अपेक्षीत असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. 

    रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच फलटण हवाई मार्गाने जगाशी जोडण्याचा मनोदय व्यक्त करीत त्यासाठी आगामी काळात फलटण येथे प्रशस्त विमानतळ आणि येथून हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही खा. नाईक निंबाळकर यांनी दिली.

     फलटण तालुक्यात कांदा आणि आंबा, डाळींब, द्राक्षे, पेरु वगैरे फळांचे तसेच फळभाज्या व पाले भाज्यांचे उत्पादन मोठे आहे मात्र त्यावर प्रक्रिया करुन परदेशी पाठविण्याची व्यवस्था नसल्याने आज ही, शेती उत्पादने कवडी मोलाने विकली जात असून रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनांचे रास्त भाव मिळाले पाहिजेत यासाठी कांद्यावर प्रक्रिया करुन त्याची पावडर आणि आंब्यासह सर्व प्रकारची फळे, फळ भाज्या व पालेभाज्यांचे निर्यातीच्या नियम, निकषांनुसार निर्जंतुकीकरण आणि त्यावर प्रक्रिया करुन निर्यातक्षम बनविणेसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून देतानाच अलीकडे वाढते ऊसाचे क्षेत्रामुळे वाढलेल्या साखर उत्पादनाची हेळसांड टाळण्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प आपण स्वतः उभारला असून त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची सर्वाधिक व वेळेवर किंमत देण्याबरोबर इंधनाची गरज भागविणे शक्य होणार असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

         नीरा - देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची कामे झाली नसल्याने गेल्या सुमारे १०/१२ वर्षांपासून या प्रकल्पाचे सुमारे ११.५ टीएमसी पाणी लाभ क्षेत्राऐवजी इतरत्र दिले जात आहे, ते टाळण्यासाठी या प्रकल्पाचे कालवे प्राधान्याने पूर्ण करणे आणि कृष्णा भीमा स्थैर्यीकरण योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, तसेच नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत भूमीसंपादन प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण करुन प्लॉट पाडून विविध प्रकारचे कारखाने येथे आणून औद्योगिक विकासाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

     केंद्रीय जल प्राधिकरण मुख्य समितीचे आपण सदस्य असल्याने हर घर जल या पंतप्रधानांच्या घोषनेनुसार माढा मतदार संघातील सर्व १७०० गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे घरात पाणी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी खा. नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    एकूणच माढा लोकसभा मतदार संघातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांच्या सक्रिय साथीने आगामी काळात माढा मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करुन विकास प्रक्रिया गतिमान ठेवण्यात आपण लोकप्रतिनिधी म्हणून कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.

No comments