विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश
Scholarships should be distributed to students immediately - orders of Higher and Technical Education Minister Uday Samant
मुंबई - : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री.विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोलथे, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बहुजन कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा सुद्धा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समन्वयातून या अडचणी तातडीने दूर करून मागील २ वर्षापासून जी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ती तातडीने वितरित करण्यात यावी. तसेच ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संबंधित विभागाने या आठवड्यात बैठक घेऊन सर्व शिष्यवृत्तीचा आढावा घ्यावा आणि ज्या त्रुटी असतील त्या दूर करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरित करण्यात यावी. प्रत्येक महिन्याला याबाबत आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.
विद्यार्थ्यांची कागदपत्रे देण्यास महाविद्यालयांनी नकार देऊन नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
No comments