लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा जिमाका): सातारा जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 78 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 31 टक्के आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा आणि यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील मजूर आहेत ते सकाळी लवकर कामाला जातात. ते लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या मजुरांसाठी सकाळी 7 वाजता लसीकरण सुरु करण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सध्या लसीचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होत असून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे याबाबत जनजागृती करावी.
यावेळी आमदार श्री. चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
No comments