Breaking News

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

Complete preparation for health department exams; Candidates should not believe rumors - Public Health Minister Rajesh Tope

    मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

    आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा श्री. टोपे यांनी आढावा घेतला.

    सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

    उमेदवारांना हॉल तिकीट वेळेत मिळावे, सर्व्हर व्यवस्थित सुरू असावा, उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचे समाधान करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करावी, अशा सूचना श्री.टोपे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांना सूचना

    राज्यातील आरोग्य विभागातील अधिकारी यांनी ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष घालावे. परीक्षा जरी बाह्यस्त्रोताद्वारे घेतली जात असली तरीही सर्व जिल्हाधिकारी यांनीही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये काही व्यक्ती परीक्षेबाबत गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पहावे, अशा सूचना पोलीस विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये

    उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुनच परीक्षेस उपस्थित राहावे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असेही श्री.टोपे यांनी सांगितले.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

    आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे, असेही श्री. टोपे स्पष्ट केले.

    उमेदवारांना परीक्षेबाबत काही शंका असल्यास त्यांनी कॉल सेंटरच्या हेल्पलाईन अथवा जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments