Breaking News

व्यसनमुक्तीची मदत वारी, पोहचली कांदाटी खोर्‍यातील पुरग्रस्तांच्या द्वारी

On behalf of  Vyasanmukti yuvak sangh , help to the flood victims in Kandati Valley

व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने कांदाटी खोर्‍यातील पुरग्रस्तांना मदत  

    फलटण - व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गेला महिनाभर कोल्हापुर जिल्ह्यातील सावर्डी, जावली तालुक्यातील केळघर, महाबळेश्वर तालुक्यातील कोयना - सोळशी आणि आज कांदाटी खोर्‍यातील अतिवृष्टी भागातील शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी २१ गावातील १२५ शेतकर्‍यांना उचाट या गावात एकत्र बोलावून मदत वाटप करण्यात आली. यावेळी या जमलेला समुदायाला मार्गदर्शन करताना व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक, युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले, लोकांसमोर आम्ही हात पसरतोय जे मिळेल ते तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. ही केवळ मदत म्हणून नव्हे तर श्री पांडूरंगाचा प्रसाद समजून घ्या असे भावनिक आवाहन समाजाला त्यांनी केले.

     व्यसनमुक्त युवक संघाने जमा केलेले ८ टन धान्य व १२५ जीवनावश्यक वस्तुंची कीट २ बोटीत भरुन "उचाट" या गावात आदल्या दिवशीच पोहचविण्यात आला.  

    शनिवार दि.२१ रोजी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे सोबत ६० हून अधिक युवा वारकरी बामणोली मधून २ बोटीतून प्रवास करीत टाळ-मृदंगाच्या तालात हरिनामाचा गजर करीत दोन तासात उचाट येथे पोहोचले. पाऊस, निसरडे रस्ते या परस्थितीत नदी पासून उचाट मंदिरापर्यंत दिंडीने गेल्याने आज अनोख्या वारीचा अनुभव या भागातील लोकांनी घेतला. अनेक ठिकाणी आरतीची ताटे घेवून महिला भगिनी रस्त्यावर दिंडीचे स्वागत करीत होत्या.

      येथे पोहचल्यावर अधिक औपचारीकतेत न अडकता आकल्पे, निवळी, लामज, वाघावळे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, मोरणी, आरव, म्हाळुंगे, शिंदी, वलवण मोरणी(पुनर्वशीत), पिंपरी, दरे, दोडाणी, पर्वत, चकदेव, लामजमुरा, आकल्पेमुरा या २१ गावातून आलेल्या १२५ कुटुंबांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

        यावेळी बोलताना ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सांगितले, तुमचे दुःख खुप मोठे असून ही मदत खुप छोटी आहे. पण घाबरु नका धैर्याने या परस्थितीचा सामना करा. आमच्या गोशाळेतून आपणास आवडतील ती जनावरे आपण घेवून या आम्ही ती आपणास अगदी मोफत देणार आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात तुमच्या दर्शनातच आम्हांला पांडूरंगाला भेटल्याचा आनंद मिळाला.

      यावेळी विलासबाबा जवळ, बाळकृष्ण महाराज शिंदे, कृष्णा साळुंखे गुरुजी यांनीही मनोगते व्यक्त केली. भानुदास वैरट, भैय्या शिंदे, जगन्नाथ शिंदे, विजयमहाराज शेलार, नंदू जगताप, आनंद जाधव यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते

No comments