Breaking News

शून्यातून 'विश्व' निर्माण करणाऱ्या नंदकुमार भोईटे यांची मनाला चटका लावणारी एक्झिट...

Nandkumar Bhoite who created the world from zero

    गंधवार्ता SPECIAL -   नंदकुमार भोईटे  Nandkumar Bhoite

    फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांनी शुक्रवार दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी मनाला चटका लावणारी एक्झिट घेतली.  नंदकुमार भोईटे यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटविला होता. लहान पणाच्या प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीवर प्रामाणिकपणे कष्ट, मेहनत चिकाटीच्या जोरावर, 'मात' करून शुन्यातून विश्व निर्माण करण्यात नंदकुमार भोईटे यशस्वी झाले, आपल्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक जीवनात शिखरावर असताना अचानक या जगाचा निरोप घेतल्याने फलटण शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    शून्यातून विश्व निर्माण करणारा, हरहुन्नरी , गरिबांचा कैवारी आणि राजकीय डावपेचात मुत्सद्दी असणारे, आणि विकास कामांचा डोंगर उभे करणारे कार्यक्षम नगरसेवक नंदकुमार भोईटे  यांनी संयमी, ठोस काम करण्याची सेवाभावी वृत्ती, मित्रत्वाने व मनमिळावू स्वभावामुळे समाजात आपली चांगली पकड निर्माण केली होती.

    नंदकुमार आबाजी भोईटे यांचे मुळ गांव आरडगांव. या ऐतिहासिक गांवी त्यांचा जन्म १६ मे १९६२ साली पुणे येथे झाला. त्यांचे वडील आबाजी भोईटे यांचे मुंबई येथे इलेक्ट्रीकचे दुकान होते. त्यांना अरूण, अशोक, शामराव व नंदकुमार अशी चार कर्तबगार मुले. मुलांचे शिक्षण होण्यासाठी सन १९६५ साली ते फलटण येथे स्थायिक झाले. आबाजीराव भोईटे यांचे धाकटे चिरंजीव नंदकुमार हे लहानपणापासून हुशार व कतृत्ववान होते. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे फलटणमध्येच झाले. मुधोजी हायस्कूल व कॉलेज मध्ये एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होत असे फलटण तालुक्याचे माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचे राजकीय संस्कार त्यांना लाभल्याने राजकीय वारसा पुढे चालविणेच्या दृष्टीने त्यांनी कॉलेजमधील निवडणूक लढविली. सी. आर. म्हणून निवडून आले. नंतर सर्व प्रतिनिधी मधून यु.आर.म्हणून निवडुन आले व नंतर विद्यापीठ स्तरावर निवडणुक लढवून शिवाजी युनिर्व्हसिटी सिनेटवर सेक्रेटरी म्हणून निवडून आले. त्यामुळे फलटण शहर व तालुक्यात त्यांची सर्वत्र प्रंशसा झाली. त्यावेळेपासून त्यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली. सन १९८५ साली त्यांनी आरडगांव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. मोठ्या मताधिक्याने निवडून आले व आरडगांवचे उपसरंपच बनण्याचा बहुमान मिळविला. उपसरपंच असताना जी जी कामे करणे शक्य आहे. ती ती कामे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. हे करीत असताना त्यांनी फलटणमध्ये इलेक्ट्रिक व्यवसायाचे दुकान काढले. या व्यवसायात नंदकुमार व त्यांच्या अरूण अशोक, शामराव या बंधूनी अहोरात्र कष्ट व प्रमाणिक मेहनत घेतली. म्हणतात ना प्रामाणिक कष्टाच्या मागे परमेश्वराची साथ असते. ती त्यांना मिळाली. सर्व सामान्य परिस्थितीवर त्यांनी मात केली. सर्व बंधूच्या एकत्रित प्रयत्नामुळे व चिकाटीमुळे या इलेक्ट्रिक धंद्यात उत्तरोत्तर प्रगति होत गेली. त्यानंतर व्यवसायामध्ये प्रगती होत गेली. 

    नंदुकुमार भोईटे यांचा फलटण शहर व तालुक्यात मोठा मित्रगण आहे. सन १९९१ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले. आपल्या वार्डातील कामे ते हिरीरीने करीत होते. एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. नगर परिषदेत ना. श्रीमंत रामराजे ना. निबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ते उत्कृष्टपणे काम करत होते. नंदकुमार यांना राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्त आवड होती. दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीची पालखी फलटणमध्ये आल्यानंतर १० ते १५ हजार भाविक वारकऱ्यांना महाप्रसाद' देण्यात त्यांचा पुढाकार असायचा. डेक्कन चौकातील जीवनज्योती गणेश क्रिडा मंडळाचे ते मुख्यमार्गदर्शक म्हणून ते काम पहात होते. मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असायचा. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, नगरसेवक काळात नगर परिषद माध्यमातून त्यांनी जनतेची खुप कामे केली आहेत. कित्येक बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नंदकुमार यांच्या योग्य व चांगल्या विधायक सल्ल्यामुळे अनेक मित्रांना व नागरिकांना यश मिळाले आहे. ते ग्रामीण भागातही लोकप्रिय आहेत. सर्वांशी प्रेमाने बोलणे वागणे, त्यांचा विधायक कामे करणे मनमिळावूपणे वागणे कामाची तत्परता व चिकाटींमुळे ते लोकमान्य कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक होता. कोणतेही काम करताना ते त्या कामात समरस व्हायचे  व त्या कामांत यशच मिळवायचे. 

    कोव्हीड संकट काळात देखील नंदकुमार भोईटे यांनी गोरगरीब जनतेला अत्यावश्यक वस्तूंचे किटस, तसेच रुग्णालयांना बेड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन अशा विविध प्रकारे मदत केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात कोव्हीड केअर सेंटरची स्थापना करून तेथे रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली. अशा या मेहनती सेवाभावी वृत्तीच्या नंदकुमार भोईटे यांच्या  अचानक जाण्याने फलटणच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!

  - ॲड. रोहित शाम अहिवळे 

No comments