Breaking News

बारमाही वांगे शेतीतून मिळाले चांगले उत्पन्न - शरद आदलिंगे ; कृषिदूताचा प्रगतशील शेतकऱ्याशी संवाद

Good income from perennial brinjal farming - Sharad Adalinge 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑगस्ट - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय बारामती ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सण 2021 22 या अंतर्गत कृषिदूत सौरभ कृष्णात कर्चे यांनी फलटण तालुक्यातील  प्रगतशील शेतकरी शरद बाबासो आदलिंगे यांच्याशी संवाद साधून  वांग्याचे पिक, उत्पादन व मार्केटिंग  याबाबत चर्चा करून माहिती घेतली.

    प्रगतशील शेतकरी शरद बाबासाहेब आदलिंगे हे आसपासच्या परिसरात त्यांच्या वांग्याच्या उत्पन्नामुळे प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या एकूण पाच एकर क्षेत्रापैकी फक्त एक ते दोन एकरावर  वांग्याची शेती करतात व यातूनच त्यांना उत्तम गुणवत्ता युक्त उत्पादन मिळते व त्याला जवळपास ते 80 ते 100 रुपये किलो असा दर मिळतो. त्यांच्या वांग्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.एकूणच योग्य नियोजनाद्वारे ते चांगले उत्पन्न घेतात. 

    वांग्यांना इतका चांगला दर कसा मिळतो या प्रश्नावर बोलताना आदलिंगे यांनी सांगितले की, ते वांग्याची दोन किंवा तीन टप्पा पद्धतीने शेती करतात. म्हणजेच एक वांगे तोडणीला येईपर्यंत दुसऱ्या वांग्याची रोपे लावून तयार असतात. अशारितीने ते  वांग्याची शेती बारमाही करीत असतात. ज्या काळात दुसऱ्या शेतकऱ्यांची लागवड चालू असते, त्या वेळी मला माझ्या वांग्यांना चांगला दर मिळतो. 

    टवटवीत व छान दिसणाऱ्या वांग याबद्दल सांगताना ते म्हणाले, जितका जास्त आपण सेंद्रिय किंवा जैविक खतांचा वापर करू, तितका टवटवीतपणा वांग्यामध्ये टिकून राहतो ते सांगतात रासायनिक खतांना माझा विरोध नाही, पण शक्य होईल तितका जैविक खतांचा वापर वाढवला पाहिजे.

दोन ते तीन टप्पा वांगे लागवड पद्धतीच्या वापरामुळे त्यांना वर्षांमध्ये एक ते दोन महिने वांग्यांना उत्तम असा भाव मिळतो, त्यांचे ठाम म्हणणे आहे की, जर वर्षभर एकाच भाजीपाला पिकाची शेती केली तर वर्षात थोड्या काळासाठी का होईना मिळणारा चांगला दर हा हमखास नफा मिळवून देतो.

    आदलिंगे यांना पहिल्यापासूनच शेतीबद्दलची आवड व विविध माध्यमांमधून माहिती घेण्याची सवय, यामुळे विविध कामे व्यवसाय करत असतानाही शेतीवर लक्ष केंद्रित केले. त्यांना गहू, मका, वांगे, ऊस या चार पिकांविषयी खूप जवळीक वाटते व या चार पिकांविषयी त्यांना खूप ज्ञान आहे.  या ज्ञानाच्या जोरावरच औरंगाबाद मधील नामवंत कंपनीद्वारे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर संघटित शेती म्हणजेच ग्रुप फार्मिंग करिता प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत ए ग्रेड प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर मका या पिकाचे सुद्धा त्यांना पारितोषिक मिळाले आहे.

No comments