फलटण पंचायत समितीत ‘सॅलरी स्कॅम’; लाखोंचा अपहार समोर ; चौकशी सुरू
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २ एप्रिल २०२६ - पंचायत समिती फलटणच्या कनिष्ठ लिपिकाने आपल्या पदाचा गैरवापर करीत सुमारे २० लाख रुपयांचा शासनाला चुना लावला असून, या घटनेमुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्याची बदली पाटण येथे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फलटण पंचायत समिती येथे कनिष्ठ लिपिक पठाण या पठ्ठ्याने ऑनलाईन पोर्टलवर आपल्या वेतनात फेरफार करून पगार वाढवून घेतला आणि २०२३ ते २०२५ या कालावधीत सुमारे २० लाख रुपये अपहार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे फलटण पंचायत समितीचा भोंगळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान फलटण पंचायत समिती मध्ये गेली चार वर्षे झाली प्रशासन राजवट असून, अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असून, कुपंनच शेत खात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी पंचायत समितीच्या चुना लावला असल्याचे स्पष्ट दिसत असून, प्रशासकीय राजवटीतील झालेल्या संपूर्ण व्यवहाराची जिल्हा परिषदेच्या आर्थिक विभागाने चौकशी करून भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे.
या पटठ्याने आपली स्वतःची सॅलरी (पगारवाढ) वाढवून सुमारे वीस लाख रुपयांचा चुना लावला असताना जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आर्थिक विभागाला याची कल्पना नव्हती का?की अजून कोणी असा गैरप्रकार केला आहे का?याची खोलात जाऊन चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
फलटण पंचायत समितीतील कारभाराबाबत यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोमले यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे.

No comments