Breaking News

फलटणमध्ये घोड्याची यात्रा उत्साहात सुरू

Horse ride begins with enthusiasm in Phaltan

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.4 -  महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी व चक्रपाणी महाराजांची जन्मभूमी असलेल्या फलटण नगरीतील महानुभाव पंथीयांची प्रसिध्द घोड्याची यात्रा सुरु असुन 7 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.  महानुभाव पंथीयांची येथे आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान, रंगशीळा अशी ४ प्रमुख मंदिरे असून त्याशिवाय शहरात शिंपी गल्ली, रविवार पेठ, महतपुरा पेठ यासह अन्य ठिकाणी या पंथीयांची अनेक मंदिरे व मठ आहेत.

    यात्रेची सुरुवात २ एप्रिल रोजी ‘छबीना’ मिरवणुकीने झाली. ७ एप्रिल रोजी मुख्य यात्रेचा दिवस असून या दिवशी देवाची पालखी आबासाहेब मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे.मान्यवर्‍यांच्या हस्ते पूजन होवून पालखी व यात्रेस सुरुवात होते. या यात्रेत मानकर्‍यांच्या खांद्यावर पितळी घोडे त्या पाठिमागे पालखी व अन्य मानकरी असतात हा सोहळा आबासाहेब मंदिरापासून दगडी पूल मार्गे श्रीकृष्ण मंदिरात (बाबासाहेब मंदिर) पोहोचतो. तेथून चावडी चौक, बारस्कर चौक, महादेव मंदिर मार्गे बाणगंगा नदीतून पितळी घोडे पाणी पिण्यासाठी मानकरी नदीपर्यंत पळत घेवून जातात या पध्दतीने बाणगंगा नदीतून बारवबाग, मलठण, दत्त मंदिर, शुक्रवार पेठेतून पालखी श्रीकृष्ण मंदिर (बाबासाहेब मंदीर) आणि पुन्हा आबासाहेब मंदिरात पोहोचल्यानंतर पालखी सोहळा समाप्त होतो.

    दरम्यान, यात्रेनिमित्त पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी विनंती  अखिल भारतीय महानुभव पंथ भोपे परिषदेचे अध्यक्ष सुनील मठपती यांनी नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे.

No comments