शेतीमधल्या नव्या वाटा ; डाळिंबासाठी प्रसिद्ध धुमाळवाडीत फुलतेय ड्रॅगन फ्रुट ची शेती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील कृषिदुत गौरव धुमाळ याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धुमाळवाडी तालुका फलटण येथील अनिल पवार यांच्या ड्रॅगन फ्रुट च्या क्षेत्रास भेट दिली व लागवड, उत्पादन आणि मार्केटींग या बद्दल माहिती जाणून घेतली.
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या अनियमित पावसामुळे डाळिंब बागायतदारांना नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. तेलकट डाग रोगामुळे डाळिंब बागा संकटात सापडत आहेत. त्यामुळे अनेक बागायतदार ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत. या शेती मध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी कमी खर्च लागत असल्यामुळे तसेच चांगले उत्पादन आणि बाजारभाव चांगला मिळतो.
सद्यस्थितीमध्ये अनिल पवार यांच्या शेतीमध्ये उपलब्ध असलेले ड्रॅगन फ्रूट हे लाल गर व लाल साल या प्रकारातील आहे . त्यांनी ड्रॅगन फ्रूट ची लागवड १ एकरमध्ये केली आहे, साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांनी ही लागवड केली होती, त्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षामध्ये १६० रुपये प्रति किलो हा भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रूट या पिकावरील कीड व रोग नियंत्रण , खत व्यवस्थापन याच्यावर होणारा खर्च इतर पिकांपेक्षा खूप कमी लागला, त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना चांगला फायदा झाला.त्यामुळे त्यांनी त्याच्या इतर क्षेत्रातही याची लागवड केली आहे. या पिकाची वयोमर्यादा १५ ते २० वर्ष इतकी असते आणि दोन रांगेत अंतर असल्यामुळे ते आंतरपीक ही घेतात, त्यामुळे त्यांना दोन्ही पिकातून चांगले उत्पन्न मिळते. ड्रॅगन फ्रूट चे औषधी गुण असल्यामुळे त्याला मार्केट मध्ये चांगली मागणी वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
No comments