तिकीट काढण्यास नकार देत प्रवाशाकडून चालक व वाहक यांना मारहाण ; गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सांगोला ते स्वारगेट एसटी बस मधील दारू पिलेल्या प्रवाशाने तिकीट काढण्यास नकार देत वाहकास (बस कंडक्टर) मी तिकीट काढणार नाही, गाडी तुझ्या बापाची आहे का ? असा सवाल करून वाहक व चालक यांना मारहाण करून एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी दशरथ किसन गोडसे रा. ढेंबरेवाडी बार्शी, जि. सोलापूर या प्रवाश्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२३ ऑगस्ट २०२१ रोजी, फिर्यादी अमर लक्ष्मण कांबळे (बस कंडक्टर) व एसटीचे चालक समाधान अण्णा लेंडवे असे दुपारी 01.00 वाजता सांगोला येथून, सांगोला ते स्वारगेट या एसटी बस नंबर MH14 BT 4711 हीने सांगोला - मोहोळ - वेळापूर - माळशिरस - नातेपुते मार्गे फलटण मध्ये दुपारी 4.00 वाजता आले. फलटण मध्ये येऊन प्रवासी चढ-उतार करून, गाडी फलटण बस स्टँडवरून क्रांतिसिंह नाना पाटील चौक मार्गे स्वारगेटला जात असताना, दुपारी 04:15 वाजता, फलटण येथील जिंती नाका चौक येथे प्रवाशांचे तिकीट काढत असताना, इसम नामे दशरथ किसन गोडसे राहणार ढेंबरेवाडी ता. बार्शी जि. सोलापूर हा दारू पिलेल्या अवस्थेत होता, त्याने फिर्यादी अमर लक्ष्मण कांबळे बस कंडक्टर यांना, मी तिकीट काढणार नाही, गाडी तुझ्या बापाची आहे का ? असे म्हणून हाताने मारहाण करून शर्ट फाडला, भांडणे सोडवण्यासाठी आलेले चालक समाधान अण्णा लेंडवे यांना देखील हाताने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी केली व गाडीचा डाव्या साईडचा बार वाकवून, गाडीचे नुकसान करून, तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून, गाडीवर धडका मारून घेतल्या असल्याची फिर्याद अमर लक्ष्मण कांबळे बस कंडक्टर यांनी दिली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ हे करीत आहेत.
No comments