Breaking News

वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धन ही काळजी गरज : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

वृक्षारोपण करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  समवेत अविरत डेव्हलपर्सचे अॅड.रणजीतसिंह भोंसले-पाटील व तुषार नाईक निंबाळकर   
Tree conservation should be done along with tree planting - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

अविरत डेव्हलपर्सच्या माध्यमातून वृक्षारोपण संपन्न

    फलटण : पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे, झाडे जंगले कमी झाली, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६०% भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ २१% भागातच वने आहेत, निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही, म्हणूनच वृक्ष लागवड करण्यासोबतच वृक्ष संवर्धन ही काळजी गरज आहे, आगामी काळामध्ये वृक्ष लागवड करुन वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखूनच अविरत डेव्हलपर्सने वृक्ष लागवडी सोबत वृक्ष संरक्षणाची जबाबदारी सुध्दा घेतलेली आहे. त्यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन आगामी काळामध्ये असे उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केले. 

    फलटण येथील घडसोली मैदान येथे युवा उद्योजक अॅड.रणजीतसिंह भोंसले-पाटील व तुषार नाईक निंबाळकर यांच्या अविरत डेव्हलपर्सच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे व्हाईस चेअरमन रमणशेठ दोशी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, मधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, भाऊ कापसे, प्रशांत नाईक निंबाळकर, अमरसिंह देशमुख, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे, तापमान दिवसेंदिवस वाढतच चाललय, उन्हाळा वाढतच चाललाय, उकाडा असह्य होऊ लागलाय, दरवर्षी थंडीच प्रमाण कमी कमी होत चाललय, पूर्वीसारखी थंडी पडतच नाही, पावसाच प्रमाणही घटलय, पावसाची अनियमितता वाढली आहे, पाऊस कधी वेळेत पडतच नाही, पाऊस पावसाळ्यात कमी आणि अवेळीच जास्त पडतोय, एकीकडे ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ, अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलंय आणि फायद्यापेक्षा नुकसानच वाढत चाललय, ह्या सर्व गोष्टी मानवासाठी अपायकारक आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये फक्त वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धन करणे ही सुद्धा काळाची गरज आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी यावेळी स्पष्ट केले. 

    पर्यावरणाचं संतुलन आपणच बिघडवलय आणि पर्यावरणाच संतुलन बिघडल्यानेच हे सर्व बिकट प्रश्न आज निर्माण झाले आहेत, पण पर्यावरणाचं बिघडलेल संतुलन पूर्वपदावर आणण्याची नैसर्गिक क्षमता वृक्ष-वनांमध्ये आहे, हवेचे प्रदूषण कमी करुन हवा प्रदूषणमुक्त करणे, हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करुन ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे, जमिनीची धूप थांबविणे, पाणी जमिनीत मुरविणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे, वातावरणातील तापमान वाढ कमी करणे, हवेत गारवा निर्माण करणे, पाऊस पडण्यासाठी आवश्यक व अनुकूल परिस्थिती तयार करुन पर्जन्यमान वाढविण्यासाठी मदत करणे, ही सर्व महत्त्वाची कामे वृक्ष आणि वनांकडून पार पाडली जातात. युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा हाती घेतलेला उपक्रम हा स्तुत्य असून आगामी काळामध्ये सर्वांनीच असे उपक्रम घेणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) म्हणाले. 

    वृक्ष लागवडीची सक्ती करून यश मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे, यासाठी या उपक्रमात सरकारी संस्था, बिगर सरकारी संस्था, वृक्षप्रेमी संघटना व जनतेलाही सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, सर्वसामान्य जनतेला वृक्षाचे मानवी जीवनातील व पर्यावरणातील महत्त्व पटवून देण्यासाठी योग्य उपक्रम राबवावेत, वृक्ष लागवड योजनेत जनतेचा सहभाग वाढवावा, असे मत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
    यावेळी अविरत डेव्हलपर्सच्या वतीने तुषार नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.

No comments