Breaking News

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडामंत्री सुनील केदार

The largest women's football tournament in Asia is in Maharashtra

एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेचे आयोजन

    मुंबई - : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील  सर्वात मोठी एएफसी महिला आशिया  कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.

    सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

    क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया  कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.

    पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्रणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.

    अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी.प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही श्री.पटेल यांनी सांगितले.

No comments