फलटण शहरात पालखी महामार्गाच्या कामात अकार्यक्षमता ; धुळीने नागरिक त्रस्त - रस्ता बंद आंदोलनाचा इशारा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ ऑक्टोबर २०२५ - सध्या पालखी महामार्ग अंतर्गत फलटण शहरात सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या कामामध्ये प्रचंड अकार्यक्षमता व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांचे खोदकाम करून ते तसेच सोडून दिल्याने नागरिक आणि व्यावसायिक दोघेही त्रस्त झाले आहेत.
महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस या मुख्य रस्त्यावरील परिस्थिती विशेषतः गंभीर असून, येथे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. या परिसरात असणारे गाळेधारक, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मंडई परिसरात ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही या समस्येमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाल्याने टू-व्हीलर व सायकल चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. अपघातांचा धोका देखील वाढला असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे.
स्थानिक नागरिक व गाळेधारकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडे अनेकदा तक्रारी केल्या असून, तातडीने नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करून धुळीपासून दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. अधिकारी वर्ग व राजकीय पदाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
दरम्यान, नागरिक व गाळेधारकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार दोन दिवसांत ठोस निर्णय व उपाय न झाल्यास ‘रस्ता बंद आंदोलन’ करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments