लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे - देवेंद्र फडणवीस
गंधवार्ता वृत्तसेवा दी. ४ जुलै - कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे. राज्याच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण झाली. पण जे ६० वर्षांत घडलं नाही, ते आपल्याला आत्ता घडताना दिसत आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबईत ५ जुलैपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी चंद्र्कांत पाटील, सुधीर मूनगंटीवार, प्रवीण दरेकर उपस्थित होते.
कमीत कमी आधिवेशन घेण्याचा नवीन रेकॉर्ड हे सरकार करीत आहे. महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत 7 अधिवेशने घेतली, 36 दिवस कामकाज घेतले. आता हे आठवे अधिवेशन 2 दिवसांचे म्हणजे 8 अधिवेशन 38 दिवसांचे. सरासरी ५ दिवस देखील सरकारच्या काळात अधिवेशन चाललेलं नाही. कोविड काळात चाललेल्या अधिवेशनांचे एकूण दिवस बघितले तर ते १४ आहेत. त्याचवेळी संसदेचा विचार केला, तर कोविड काळात संसदेची ६९ दिवस अधिवेशनं चालली. कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारच्या वतीने केलं जात आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण झाली. पण जे ६० वर्षांत घडलं नाही, ते आपल्याला आत्ता घडताना दिसत आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली आहे”, अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली आहे.
“मिनिट्समध्ये लिहिण्यात आलं आहे की कोणतंही आयुध वापरता येणार नाही. कदाचित अशा प्रकारची लोकशाही आणीबाणीच्या काळात पाहिली असेल. कोविड आहे, वेळ कमी करतोय इथपर्यंत ठीक आहे. पण सदस्यांना कोणतंही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा निर्णय म्हणजे लोकशाहीला कुलूपबंद करण्याचा प्रयत्न आहे”, असं फडणवीस म्हणाले.
No comments