Breaking News

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Electric vehicles will be promoted and given priority - Deputy Chief Minister Ajit Pawar

    पुणे, दि.21: राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

    फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक  थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलिटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, श्री. केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रिक  थ्री-व्हिलर गाड्यांची वितरण सेवा सुरु केली आहे. गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ऑटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रिक  वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलिटीच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक  थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त असतील. प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल. पेट्रोल, ‍डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रिक  मोटारी प्रवासी व मालवाहतुकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदूषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे.

    या पुढच्या काळात इलेक्ट्रिक  गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. राज्यातलं वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक  वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक  वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक  वाहने हाच पर्यावरणपूरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फिटवेल मोबिलिटी कंपनी, मॅन-युनायटेड एचआर अँन्ड मार्केटींग कंपनी, चैतन्य सेल्स सर्विसेस कंपनी, इलेक्ट्रिक  गाड्यांच्या उत्पादन, विक्री, देखभाल-दुरुस्तीच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधितांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

No comments